कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लॉकडाऊनच्या काळात घातलेली बंधने आता मुंबई हळूहळू अनलॉक होत असल्याने कमी होऊ लागली आहेत. घरात अडकून पडलेले नागरिक बाहेर पडू लागले आहेत. त्यामुळे काही पर्यटनस्थळे देखील गजबजू लागली आहेत. मात्र यावेळी नागरिक सोशल डिस्टंगसिंगचा बट्याबोळ करत असल्याचे समोर येत आहे. शनिवार १५ ऑगस्ट, स्वातंत्र्य दिन आणि रविवार असे दोन दिवस असणाऱ्या सुट्यांचा फायदा घेत मुंबईकरांनी विहार तलावावर तुडुंब गर्दी केली होती.
लोकांच्या आकर्षणाचे पर्यटनस्थळ म्हणून ओळख असणारा पवई तलाव पावसाळ्यात ओव्हरफ्लो झाला कि तो पाहण्यासाठी लोकांची नेहमी तुडूंब गर्दी होत असते. बोरीवली राष्ट्रीय उद्यानाच्या निसर्ग सौंदर्यात लपलेला मुंबईला पाणीपुरवठा करणारा विहार तलाव देखील पर्यटकांसाठी विशेष आकर्षण आहे. सतत मुंबईत सुरु असणाऱ्या पावसामुळे काही दिवसांपूर्वीच विहार तलाव ओसंडून वाहू लागला आहे. मुंबईत लॉकडाऊनचे नियम शिथिल झाले असून, नागरिकांनी बाहेर निघण्यास सुरुवात केली आहे. शनिवार स्वातंत्र्य दिन आणि रविवार अशा दोन सुट्यांचा फायदा घेत मुंबईकरांनी विहार तलावावर तुडुंब गर्दी केलेली होती.
विहार तलावावर पावसात भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी आणि पिकनिकसाठी लोकांची अफाट गर्दी दिसून आली. मात्र यावेळी सोशल डिस्टंगसिंगचे तीन-तेरा वाजलेले दिसून आले. तसेच पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही यंत्रणा या ठिकाणी दिसून आली नाही.
“लोकांना अटकाव करण्यासाठी कोणीच नसल्याने विहार तलावावर तुफान गर्दी होत आहे. ही चिंतेची बाब असून, एखादा अनुचित प्रकार घडू नये यासाठी महानगरपालिकेने वेळीच लक्ष देऊन कडेकोट बंदोबस्त करावा” अशी मागणी येथील स्थानिक नागरिक करत आहेत.
प्रत्येक पावसाळ्यात विहार तलावात येथे आलेल्या काही पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. पाठीमागील वर्षी एका घटनेत विहार तलावात पोहायला गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला होता, तर दुसऱ्या घटनेत मित्रांसोबत वाढदिवसाची पार्टी साजरी करण्यासाठी गेलेल्या एका ५२ वर्षीय इसमाचा सुद्धा बुडून मृत्यू झाला होता.
“पालिकेने पूर्ण सुरक्षेच्या उपाययोजना केलेल्या आहेत, सुरक्षारक्षक तैनात आहेत, मात्र पर्यटक हे आदिवासी पाडे आणि इतर भागातील मार्गाने येथे प्रवेश करत आहेत” असे याबाबत बोलताना पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा.
No comments yet.