चित्रपट आणि मालिका कलाकारांचे चाहते त्यांच्या आवडत्या कलावंतांवर असणाऱ्या प्रेमापोटी सर्व मर्यादा ओलांडताना आढळून येतात. काही चाहते अगदी विचित्र वेडेपणा करत आपल्या आवडत्या कलाकाराला शॉक देवून जातात. असेच एक उदाहरण काल पवईत पहायला मिळाले, “तारक मेहता का उल्टा चष्मा” या मालिकेतील जेठालाल म्हणजेच दिलीप जोशीला भेटण्यासाठी राजस्थानच्या दोन भावंडांनी मजुरीतून चार हजार रुपये मिळवून, रविवारी चक्क मुंबई गाठली. मात्र त्यांच्या संशयास्पद वागण्याला पाहता एका वाटसरूने त्यांना पवई पोलिसांच्या स्वाधीन केले आणि ते आपल्या लाडक्या कलाकाराला भेटायला पळून आल्याचे उघड झाले.
आयुब – वय १३ आणि लवकेश – वय १४ (बदललेली नावे) हे राजस्थानच्या छानी गावात आपल्या मामासोबत राहतात. दोघे अनुक्रमे आठवी आणि नववी इयत्तेत शिक्षण घेत आहेत. तारक मेहता का उल्टा चष्मा मालिका त्यांना खूप आवडते, यातील जेठालालचे ते फॅन्स आहेत.
“आपल्या या आवडत्या कलाकाराला भेटण्याची त्यांची खूप इच्छा होती. आई-वडिलांसह मामाकडे त्यांनी आपली ही इच्छा व्यक्त केली, मात्र त्यांनी नकार दिला. घरातून अनुमती मिळत नसल्याचे पाहून दोघांनी घरातून पळून जावून मुंबईला त्यांची भेट घ्यायचे ठरवले. यासाठी लागणाऱ्या खर्चाच्या सोयीसाठी त्यांनी मजुरीतून कमावलेले चार हजार रुपये मिळताच, शनिवारी त्यांनी थेट मुंबईला येणारी गाडी पकडली” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.
ते पुढे म्हणाले की, “मालिकेत जेठालालची पत्नी दाखवलेली दयाबेन ही पवईत राहत असल्यामुळे जेठालाल सुद्धा येथेच राहत असावा असा समज होवून त्यांच्या घराची चौकशी करताना मुलांचे वागणे संशयास्पद वाटत असल्याने एका प्रवाशाने त्यांना सरळ पवई पोलीस ठाण्यात आणले.”
कर्तव्यावर असणारे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब मोटे आणि महिला पोलीस उपनिरीक्षक रिना पवार यांनी मुलांकडे चौकशी केली असता ते आपल्या लाडक्या कलाकाराला भेटण्यासाठी घरात काहीच न-सांगता पळून आल्याचे समोर आले. राजस्थान पोलिसांशी त्वरित संपर्क साधून त्यांच्या पालकांपर्यंत मुले सुखरूप असल्याचा निरोप पोहचवण्यात आला.
आज (सोमवारी) त्यांचे पालक मुंबईत दाखल झाले असून, मुलांना समितीसमोर हजर करून पालकांना सोपवण्यात आले आहे.
जेठालालशी नाही घडणार भेट
जेठालाल सोबत या दोन मुलांची भेट घडवून आणण्यासाठी पवई पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु होते, मात्र यांची प्रेरणा घेवून अजूनही मुले घरातून पळून येतील अशी भीती समितीने व्यक्त केल्यामुळे या मुलांना आपल्या लाडक्या कलाकाराला भेटल्याशिवायच परतावे लागणार आहे.
No comments yet.