नेहमीच तक्रार, कायदा-सुव्यवस्था यांच्या घेऱ्यात अडकलेल्या पोलिसांना विरंगुळा मिळणे अवघडच. मात्र गुरुवारी रात्री पवई पोलिसांनी जवळपास दीड तास हा विरंगुळा अनुभवला. निमित्त होते पोलीस ठाण्यात आलेल्या माकडाचे. पोलीस ठाण्यात आलेल्या या पाहुण्याने तक्रारदार, पोलीस यांच्यासोबत मस्ती करत सर्वांचे मनोरंजन तर केलेच, शिवाय जाताना रिक्षाने ऐटीत परतले.
गुरुवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास एक माकड अचानक पोलीस ठाण्यात पोहचले. सुरुवातीला तक्रार देण्यास येणाऱ्या लोकांसाठी ठेवण्यात आलेल्या खुर्च्यांपैकी एकावर आपले बस्तान मांडले. काही वेळाने त्याने आपली जागा बदलत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या तक्रारदाराच्या डोक्यावर आणि नंतर शिपायाच्या खांद्यावर ते जावून बसले. पण हे सर्व करत असताना कोणाला इजा होणार नाही याची काळजी घेतानाही जाणवत होते.
“माकडाने आपले कर्तब दाखवत केवळ आमचे मनोरंजनच केले नाही, तर त्याने एका अधिकाऱ्याच्या मांडीवर बसून तक्रार पुस्तक चाळून आमचे काम व्यवस्थित चालू आहे कि नाही याची खात्री केली” असे याबाबत बोलताना उपस्थित अधिकाऱ्यांनी हसत हसत सांगितले.
१२.१५ वाजण्याच्या सुमारास मोरारजीनगर येथून आई आपल्या मुलाला तो दारू पिऊन आला होता म्हणून पोलीस ठाण्यात घेवून आली होती. त्याचे समुपदेशन चालू असताना आलेल्या पाहुण्याचा पाहुणचार म्हणून आम्ही त्याला खाण्यास दिले. खाऊन झाल्यावर ते खिडकीत बसून सतत बाहेर रस्त्यावर कोणाची तरी वाट पाहत होते, असेही ते पुढे म्हणाले.
१२.३० वाजता अजून एक तक्रारदार रिक्षातून त्याच्या मुलाला घेवून पोलीस ठाण्यात आला होता. मुलगा कोणत्यातरी पोरीच्या प्रेमात पडला होता. सज्ञान नसल्याने त्याचे पाऊल कसे चुकीच्या मार्गाने चालले आहे, याचे समुपदेशन द्यायला मुलाला घेवून ते गृहस्थ आले होते. ते रिक्षातून उतरताच माकडाने बाहेर उडी मारत, रिक्षात जावून बसले. रात्री १ वाजता समुपदेशन झाल्यावर जेव्हा रिक्षाचालक रिक्षा काढण्यासाठी गेला तेव्हा माकडाने त्याला बाहेर ढकलून हकलले. असे उपस्थित लोकांपैकी एकाने आवर्तन पवईला सांगितले.
अखेर पोलिसांनी रिक्षाचालकाला माकडाला पवई उद्यानात सोडून ये आणि मग तुझ्या पासेन्जर्सना घेवून जा, असे सांगितल्यावर माकडानेही इशाऱ्यातच त्याला दुजोरा दिला. रिक्षा पवई उद्यानाजवळ जावून थांबतच माकडाने रिक्षातून उतरून झाडांवर धूम ठोकली.
पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी माकडाच्या सदिच्छा भेटीला बातमीला दुजारा देत त्याने कोणालाही कसलीही इजा केली नसल्याचे स्पष्ट केले.
No comments yet.