@रविराज शिंदे | पवईतील जवळपास १० हजार लोकवस्तीचा दाटीवाटीचा परिसर असणाऱ्या आयआयटी पवई येथील महात्मा फुले नगरात शनिवारी, २ मे रोजी येथील स्थानिक रहिवाशांच्या तपासणीसाठी फिव्हर क्लिनिकचे आयोजन करण्यात आले होते. बृहन्मुंबई महानगरपालिका एस विभाग आणि स्थानिक नगरसेविका जागृती पाटील यांच्या माध्यमातून या फिव्हर क्लिनिक चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात रहिवाशांनी याचा लाभ घेतल्याने त्यांच्या मनातील शंका दूर झाल्या आहेत.
जगभर थैमान घातलेल्या कोरोनामुळे पवईत बाधितांची संख्या ४५ वर पोहचली आहे. तर पवईतील एकट्या आयआयटी मार्केट येथील फुलेनगर भागात ७ लोकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे सावट होते. झोपडपट्टी आणि दाटीवाटीचा परिसर असल्याने येथे कोविड १९ आजाराच्या संसर्गाचा धोका अधिक आहे. ज्याला पाहता बाधित रुग्णाच्या संपर्कात असणाऱ्या येथील ६० ते ७० लोकांना अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
मात्र केवळ ७० लोकांचे अलगीकरण करून हा प्रश्न मिटणारा नाही. येथील छोट्या छोट्या घरात राहणाऱ्या कुटुंबातील एकाला झालेला सर्दी, खोकल्या सारखी लक्षणे सुद्धा रहिवाशांना धोकादायक वाटत आहेत. त्यातच खाजगी क्लिनिक बंद असल्याने या नागरिकांमध्ये मोठा संभ्रम असून, आपल्याला सुद्धा कोरोनाची लागण झाली नाही ना या भीतीने नागरिकांच्या झोपा उडाल्या आहेत.
हे सुद्धा वाचा: पवईतील १० बाधित कोरोना मुक्त, सोडले घरी
नागरिकांच्या या अवस्थेला पाहता स्थानिक नगरसेविका जागृती पाटील यांच्या प्रयत्नाने पालिका एस आरोग्य विभागाच्यावतीने येथे शनिवारी फिव्हर क्लिनिक च्या माध्यमातून नागरिकांची तपासणी करण्यात आली. मोठ्या प्रमाणात लोकांनी यावेळी आपल्या तपासण्या करून घेत आपल्या मनातील कोरोनाच्या शंका दूर केल्या.
“मोठ्या प्रमाणात नागरिक भर उन्हात उभे असल्याने तपासणीसाठी आलेल्या एक ज्येष्ठ नागरिकाला भोवळ आल्याची घटना सुद्धा येथे घडली. उपस्थित तरुणांनी त्वरित त्यांना सावलीत घेवून जात दिलासा दिला.” असे याबाबत बोलताना येथील स्थानिकांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “मुळात या तपासणी शिबाराने अनेकांची निराशाच केली. कोरोना तपासणी शिबीर आयोजित केले असल्याची माहिती नागरिकांना देण्यात आली होती, मात्र प्रत्यक्षात तशा कोणत्याच तपासण्या येथे होत नव्हत्या.”
अशा प्रकारच्या शिबिरांमध्ये सगळ्यांच्याच कोरोना चाचण्या करणे शक्य नसते. लक्षणे किंवा तसा इतिहास असलेल्या व्यक्तींच्याच तपासण्या होत असतात. लक्षणे असलेले रुग्ण आढळून आल्यास त्यांना पुढील तपासणीसाठी सूचना केल्या जातात तसेच संबंधित विभागांना त्यांची माहिती सुद्धा पुरवली जाते. असे याबाबत बोलताना काही सुजाण नागरिकांनी सांगितले.
बातम्यांच्या अपडेटसाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा
[…] मिळून येत असल्याने शनिवारी या भागात फिव्हर क्लिनिकचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते. यावेळी खूप […]