शनिवारी पवईतील फुलेनगर भागातील डोंगराळ भागात मिळालेल्या अनोळखी पुरुषाच्या शवाची ओळख पटली आहे. भांडूप पश्चिम येथील रमाबाई नगर येथे राहणाऱ्या प्रशांत राणे नामक व्यक्तीचे ते असल्याचे उघड झाले आहे. अज्ञात व्यक्तीविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून पवई पोलीस त्याच्या खुनामागील कारण आणि आरोपी यांचा शोध घेत आहेत.
फुलेनगर येथील डोंगरभागात तलावाजवळ झुडूपातून वास येत असून, एक व्यक्ती तिथे पडला असल्याची माहिती एका पादचाऱ्याने पोलिसांना कळवली. “१६ ऑक्टोबर रोजी कुजलेल्या अवस्थेत शव सापडले होते. त्या व्यक्तीची ओळख पटवणे कठीण होते. आम्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात पाठवत फोटो तसेच त्याचे कपडे याची माहिती सर्व पोलिस स्टेशनमध्ये पाठवली होती. भांडूप पोलिस ठाण्यात ९ ऑक्टोबर रोजी वर्णनाशी जुळणाऱ्या कपड्यातील हरवलेल्या व्यक्तीच्या नोंदवलेल्या तक्रारीची माहिती आम्हाला मिळाली.” असे पवई पोलिसांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “भांडूप येथे राहणाऱ्या आणि वाहनचालक असणाऱ्या प्रशांत राणे याचे ते शव असल्याची ओळख पटली आहे. कुटुंबियांना बोलावून व्यक्तीची ओळख पटवण्यात आली आहे. सुरुवातीच्या अहवालानुसार मारेकऱ्याने मृताच्या छातीच्या डाव्या बाजूला धारदार शस्त्राने वार केला असून, त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला आहे. परिवाराचे जवाब नोंदवण्यात आले आहेत. चौकशीत अजूनही संशयास्पद अशी कोणतीच गोष्ट समोर आलेली नाही.”
भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (खून) अंतर्गत गुन्हा दाखल करत पवई पोलीस अधिक तपास करत आहेत.
No comments yet.