हिरानंदानी रहिवाशांसाठी आनंदाची बातमी असून, गेल्या दोन महिन्यांपासून हिरानंदानी परिसरात येणाऱ्या हॉकिंग झोनला घेवून असणारी टांगती तलवार पालिकेने जाहीर केलेल्या नव्या यादीनुसार आता त्यांच्यावरून हटली आहे. पालिकेने ३ जानेवारी २०१८ रोजी आपल्या वेबसाईटवर घोषित केलेल्या हॉकिंग झोनच्या यादीमध्ये पवईतील हिरानंदानीत इस्ट अव्हेन्यू रोड वगळता कोणत्याच रस्त्यावर हॉकिंग झोन दाखवण्यात आलेले नाही. यावरून २०१४ साली झालेल्या सर्वेक्षणात हिरानंदानी परिसराला हॉकिंग झोनमधून वगळण्यात आल्याचे समोर येत आहे. मात्र पवईकरांनी एवढ्यावरच हुरळून न-जाता अंतिम यादी घोषित होईपर्यंत आपला संघर्ष असाच सुरु ठेवण्याचे आवाहन रहिवाशी संघटनांनी केले आहे.
फेरीवाल्यांनी व्यवसाय कुठे बसून करावा? म्हणजेच फेरीवाला क्षेत्र (हॉकिंग झोन) कुठे बनवण्यात यावे हे जाहीर करताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हॉकिंग झोन अंतर्गत मुंबईतील २४ विभागांमध्ये २२०९७ ओट्यांना मान्यता दिल्याची यादी पालिकेने डिसेंबर महिन्यात जाहीर केली होती. या यादीतनुसार पालिका एस विभागात एकूण ४२५० ओट्यांना मान्यता देण्यात आली होती; तर विभागांतर्गत येणाऱ्या पवईमधील हिरानंदानी, आयआयटी आणि फिल्टरपाडा भागात मिळून २१२६ ओट्यांना मान्यता देण्यात आल्याचे दर्शवले होते.
मात्र या यादीत काहीतरी गोंधळ असल्याचे दर्शवत मुंबईकरांनी याला मोठा विरोध दर्शवल्यानंतर ३ जानेवारी २०१८ रोजी पालिकेने पुन्हा एक यादी आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून प्रकाशित केली आहे. या यादीनुसार मुंबईमध्ये एकूण ८५८९१ ओट्यांना मान्यता देण्यात आली असून, पालिका एस विभागांत २२११ ओट्यांना मान्यता देण्यात आली आहे.
जुन्या यादीनुसार आयआयटी येथील अपना बजार रोड, प्रशांत अपार्टमेंट रोड, प्रशांत अपार्टमेंट ते एसजीएफ/११/०११ आणि गोखलेनगर भागाला फेरीवाला क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. फिल्टरपाडा येथील मोरारजी नगर ते दर्गा (पश्चिम) भागात; तर हिरानंदानीमधील क्लिफ एव्हेन्यू रोड, सेन्ट्रल एव्हेन्यू रोड, टेक्नोलॉजी स्ट्रीट, फॉरेस्ट स्ट्रीट आणि ऑर्चीड एव्हेन्यू रोड अशा ५ रोडवर फेरीवाले क्षेत्रांना मान्यता दिल्याचे जाहीर केले होते.
मात्र, ३ जानेवारी रोजी घोषित केलेल्या यादीत हिरानंदानीमधील इस्ट एव्हेन्यू रोडवर २० ओटे वगळता हिरानंदानीतील कोणत्याही रस्त्यांचे नाव यादीत समाविष्ट करण्यात आलेले नाही. याव्यतिरिक्त आयआयटीमध्ये मुक्तेश्वर आश्रम रोडवर ६४, जैन मंदिर रोडवर २०, प्रशांत अपार्टमेंट रोडवर ३०, गोखले नगर मच्छीमार्केट येथे १७० आणि अपना बझार रोडवर २० ओट्यांना दाखवण्यात आले आहे.
‘पूर्वी २००७ सालची यादी घोषित करण्यात आली होती, मात्र नागरिकांचा विरोध आणि पालिकेला आपली चूक लक्षात येताच जुलै २०१४ मधील सर्वेक्षणानंतर बनवण्यात आलेली यादी पालिकेने जानेवारी महिन्यात जाहीर केली. या यादीवर ३१ जानेवारी पर्यंत लोकांना हरकती किंवा सूचना असल्यास कळवायच्या आहेत.’ असे याबाबत बोलताना नाव जाहीर न-करण्याच्या अटीवर पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
पालिकेने जाहीर केलेल्या नवीन यादीत हिरानंदानी येथील कुठल्याही प्रमुख रस्त्याचे नाव नसले तरी पवईकरांनी निषेधाची उपसलेली हत्यारे फेकून न-देता आपला विरोध हा अंतिम यादी जाहीर होईपर्यंत असाच चालू ठेवण्याचे आवाहन रहिवाशी संस्था आणि स्वयंसेवी संस्थांकडून पवईकरांना करण्यात आले आहे.
No comments yet.