जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर पवईतील एनएसजी कॅम्पसमोरील भागात रिक्षातून प्रवास करणाऱ्या लोकांचे मोबाईल चोरी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सागर चंदू ठाकूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
कोरोनाच्या मोठ्या ब्रेकनंतर मुंबई हळूहळू आता पूर्व पदावर येत आहे. याचवेळी गुन्हेगारी प्रवूत्तीत सुद्धा वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. पवईतील काही भागात चालत्या वाहनातून मोबाईल चोरीच्या घटना घडत असल्याचे समोर येत होते. त्या अनुषंगाने पवई पोलिसांचे गुन्हे प्रकटीकरण पथक याचा तपास करत होते.
“आमच्या तपासात जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर एनएसजी बेसजवळील भागात एक तरुण रिक्षातील प्रवाशांचे मोबाईल चोरी करत असल्याचे समोर आले होते.” असे यासंदर्भात बोलताना गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीच्या आधारावर पवई पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला असता यातील काही मोबाईल वापरात असल्याचे आढळून आले. “आम्ही त्यांच्या वापर करणाऱ्या लोकांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांना हा मोबाईल सागर नामक तरुणाने दिल्याची माहिती मिळाल्याने, सागरला ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.” असे गुन्हे प्रकटीकरण पथकाने सांगितले.
भादवी कलम ३७९ नुसार नोंद गुन्ह्यात आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी अटक आरोपीकडून चोरी केलेले मोबाईल हस्तगत केले आहेत.
No comments yet.