प्लांट अँड अनिमल वेलफेअर सोसायटी (पॉज) मुंबई आणि अम्मा केअर फाऊंडेशन (एसीएफ) स्वयंसेवी संस्थाच्या सतर्क स्वयंसेवकांनी रविवारी दोन मुलांपासून पवई तलावातून पकडलेल्या दोन भारतीय सॉफशेल कासवांना वाचविण्यात यश मिळवले आहे.
सविता करळकर या पवई तलावाजवळून बेस्ट बसमधून प्रवास करत असताना, त्यांनी दोन मुलांना पवई तलावातून पकडून कासवाची पिल्ले घेऊन जाताना पाहिले. त्या ताबडतोब बसमधून खाली उतरल्या आणि त्यांनी कासवांसंबंधी त्यांच्याकडे चौकशी केली. त्यांनी ती पवई तलावातून पकडल्याचे सांगताच सविता यांनी त्वरित पॉज मुंबई ला याबाबत माहिती देत कासवांना वाचवले.
बचाव मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या निशा कुंजू यांनी याबाबत आवर्तन पवईशी बोलताना सांगितले की, “दोन कासवांपैकी एकाच्या तोंडाच्या पोकळीत सेफ्टीपिनचा बनवलेला गळ अडकलेला होता. आम्ही दोन्ही कासवांना पशुवैद्याकडे घेऊन गेलो. आम्हाला त्या दोन मुलांकडे प्लास्टिकचा धागा सुद्धा सापडला ज्याचा वापर माशांना पकडण्यासाठी होतो.”
त्या पुढे म्हणाल्या, “मुलांच्या गळाला चुकून कासव लागले असल्याचे त्या दोघांनी सांगितले. ते त्याला घरात पाळण्यासाठी ठेवणार होते.”
“कासवाच्या तोंडातून गळ (सेफ्टीपिन) काढून टाकला आहे, तोंडीच्या पोकळीत खोल जखम झाल्याचे आढळले नाही. कासव सामान्यपणे आहार घेत आहे. त्याच्या सर्व क्रिया सामान्य असल्याचे आढळून आले आहे,” असे पशुवैद्य डॉ. राहुल मेश्राम यांनी याबाबत बोलताना सांगितले.
पवई तलावातील जलचरांच्या जीवाला धोका
आवर्तन पवईशी बोलताना मुंबई शहरातील मानद वन्यजीव वॉर्डन सुनिश सुब्रमण्यन म्हणाले, “प्राणी, पक्षी आणि जलचरांसाठी पवई तलाव फार महत्वाचा आहे, कारण येथे वन्यजीव प्रजातींव्यतिरिक्त मासे आणि मगरी सुद्धा आहेत. या भागात अवैध मासेमारीमुळे तलावातील जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. मी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना पवई तलावावर नियमितपणे गस्त घालण्याची विनंती करत रेंज फॉरेस्ट ऑफिसरला पत्र लिहिले आहे.”
ते पुढे म्हणाले की, “भारतीय सॉफशेल टर्टल वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२च्या अनुसूची १ अंतर्गत संरक्षित प्रजाती आहे, म्हणून त्यांची शिकार करणे किंवा त्यांना ठेवणे गुन्हा आहे.”
No comments yet.