मुंबई परिसरात चरस या अंमलीपदार्थाचा पुरवठा करणाऱ्या एका सराईत आरोपीला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून पवई पोलिसांनी ३.५ कोटी किंमतीचा चरस हा अंमली पदार्थ व एक गावटी बनावटीचा कट्टा हस्तगत केला आहे.
पवई परिसरात अंमली पदार्थ खरेदी-विक्री रोखण्यासाठी पवई पोलीस ठाण्याच्या दहशतवाद विरोधी सेलचे पोलीस उपनिरीक्षक शोभराज सरक हे आपल्या पथकासह पवई परिसरात गस्त करत होते. “गस्ती दरम्यान चांदशहावाली दर्गा परिसरात, कब्रीस्तान जवळ एक ग्रे रंगाची मारुती अल्टो मोटार कार क्रमांक एमएच ०४ एलएच २२०१ उभी असून, त्यात मोहम्मद सादिक हनीफ सय्यद (४६) हा अंमली पदार्थ विक्रीसाठी अभिलेखावरील आरोपी असल्याचे पथकाला आढळून आले. त्याला ताब्यात घेवून त्याची व गाडीची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात ६ किलो ३२ ग्राम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ, १८.५ सेमी लोखंडी बॅरल आणि गावठी बनावटीचा कट्टा मिळून आला,” असे पोलिसांनी आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.
“आरोपीकडे केलेल्या कौशल्यपूर्ण तपासात त्याच्या घरातून आणखी ७ किलो १८५ ग्राम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे,” असे दहशतवाद विरीधी सेलचे पोलीस निरीक्षक शोभराज सरक यांनी सांगितले.
पवई पोलिसांनी राबवलेल्या या विशेष मोहिमेत एकूण १३ किलो २१७ ग्रॅम चरस (किंमत तीन कोटी ३० लाख ४२ हजार ५०० रुपये) एक गावठी कट्टा (किंमत १० हजार रुपये), मोटरगाडी (किंमत चार लाख रुपये) व साडे तीन हजार रोख रक्कम असा एकूण तीन कोटी ३४ लाख ५५ हजार ९१० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
“आरोपी हा अभिलेखावरील गुन्हेगार असून, आरोपीविरोधात यापूर्वीही अंमली पदार्थ विक्रीचे दोन व सेवनाबद्दल एक गुन्हा दाखल आहे.” असे यासंदर्भात बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे म्हणाले.
याप्रकरणी आरोपी मोहम्मद सादिक हनीफ सय्यद विरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा कलम ८ (क) सह २०(ब), २ (क) तसेच भारतीय शस्त्र कायदा कलम ३, २५ अंतर्गत गुन्हा नोंद करून सय्यद याला अटक करण्यात आली आहे.
सदर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक (का व सु) प्रवीण पवार यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कांबळे, पोलीस उपनिरीक्षक शोभराज सरक, पो.ह. उदय लांडगे, पो.ह. सुभाष खंडागळे, पो.शि. राकेश अहिर, पो.शि केदार गायकवाड, पो.शि. निवृत्ती पवार यांनी केली.
आरोपीने अंमली पदार्थ कोठून आणले? त्याच्या सोबत इतर कोणी साथीदार आहेत का? हत्यार कोठून आणले? याबाबत पवई पोलीस अधिक तपास करत आहेत.
No comments yet.