एका व्यावसायिकाला २३.७ लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी पवई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. ६१ वर्षीय कपडे व्यापाऱ्याला ३१ ऑक्टोबर रोजी एका खासगी क्रमांकावरून फोन करून खंडणी मागण्यात आली. पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला (+९७१) दुबईचा कोड दर्शविणाऱ्या नंबरवरून पहिला कॉल आला आणि दुसरा कॉल न्यू जर्सी, अमेरिका (+२०१) वरून आला आहे.
घाटकोपर येथील रहिवाशी असणारे कपडे व्यापारी यांनी हिरानंदानी येथील एका नामंकित रुग्णालयात आपल्या सुनेला डिलिव्हरीसाठी दाखल केले होते. “३१ ऑक्टोबरला नातू झाल्याच्या आनंदात असताना ६.४५ वाजता त्यांना एका खाजगी क्रमांकावरून फोन आला, जो मोबाईल स्क्रीनवर दिसत नव्हता. कॉलरने त्यांच्याकडे खंडणीची मागणी केली. व्यावसायिकाला धमकी दिली की त्यांची माणसे हॉस्पिटलच्या बाहेर त्यांच्या कुटुंबावर पाळत ठेवत आहेत आणि पैसे न मिळाल्यास त्यांना ठार मारतील,” असे पोलिसांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले “कॉलरने तक्रारदाराला सांगितले की, त्याच्यावतीने त्याच्या कर्मचाऱ्यांना ड्रग्ज विकली आहेत आणि पांढर्या पावडरचे पैसे देणे बाकी आहे.”
तक्रारीत, व्यावसायिकाने पोलिसांना सांगितले की, फोन करणार्याने प्रथम त्यांना आजोबा होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि म्हणाला “संजयजी बधाई हो, बडी खुशी का माहोल है. अल्लाह ने आपको पोता दिया है. बहुत अच्छी बात है. आपके बंदे ने हमारे से माल उठाया है (सफेद वाला पावडर),” आणि २४ तासांच्या आत पैसे देण्याची मागणी केली, अन्यथा “स्वर्ग से नरक में बदलने में समय नहीं लगेगा.
यासंदर्भात बोलताना तपासी अधिकाऱ्याने सांगितले कि, “पहिला फोन करणाऱ्या व्यक्तीने व्यावसायिकाला पैसे ट्रान्सफर करण्यासाठी दुसऱ्या कॉलची वाट पाहण्यास सांगितले. मात्र तक्रारदार यांनी न्यू जर्सीहून आलेला दुसरा कॉल उचलला नाही. कॉल इंटरनेटचा व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (व्हीपीएन) वापरून करण्यात आले असण्याची शक्यता आहे.”
ते पुढे म्हणाले, “संबंधित रेकॉर्ड सायबर आणि टेक्निकल टीमच्या मदतीने तपासत आम्ही कॉलरचा शोध घेत आहोत. या प्रकरणात अंतर्गत सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण तक्रारदार यांनी आजोबा झाल्याचा आनंद काही ठराविक लोकांसोबत साजरा केल्यानंतर काही वेळाने त्यांना हा खंडणीचा फोन प्राप्त झाला आहे.
No comments yet.