सुषमा चव्हाण, प्रतिक कांबळे
उध्दरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे… अशी भावना, कृतज्ञता व्यक्त करत राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती सोमवारी राज्यासह, देशविदेशात अपूर्व उत्साहात साजरी झाली. यानिमित्ताने वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रबोधन कार्यक्रम, रक्तदान शिबीर अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी विविध भागातून मिरवणुका देखील काढण्यात आल्या. पवई, चांदिवलीमध्ये देखील सालाबादप्रमाणे प्रत्येक चौकाचौकात सामाजिक संघटना, पक्ष, महिला बचत गट यांच्यावतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव २०२५ मोठ्या थाटामाटात आणि जल्लोषात साजरा केला.
पवईतील इंदिरा नगर रहिवाशांच्यावतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची शोभायात्रा मिरवणूक पवईतील परिसरात काढण्यात आली. भिमसेना पवई प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून सुंदर असा देखावा येथे साकारण्यात आला होता. तर पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्यावतीने पवईतील चैतन्यनगर चौकात सामुदायिक त्रिशरण-पंचशील ग्रहण करून महामानवाला अभिवादन करण्यात आले. त्याच प्रमाणे गोखले नगर, माता रमाबाई आंबेडकर नगर १, हरिओम नगर, आय.आय.टी मार्केट या ठिकाणी महामानवाला मानवंदना देणारे आणि त्यांच्या कार्याचे प्रतिक असणारे भव्य असे आकर्षित देखावे बनवण्यात आले होते.
पवईतील हनुमान रोड येथील सामाजिक कार्यकर्त्या कल्पना घोक्षे व मुस्लिम बांधवांनी एकत्रित येत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली. यावेळी त्यांच्यावतीने स्थानिकांना थंड सरबत वाटप करण्यात आले.
एकीकडे राज्यातील काही भागात सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या घटना घडत असताना पवईमध्ये सर्व समाजातील नागरिकांनी एकत्रित येत महामानवाचा जयंती उत्सव मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा करत एकात्मतेचा संदेश देत, बाबासाहेबांच्या विचाराचे प्रतिक दिले.
ठिकठिकाणी विविध संघटना पक्ष यांनी खीर दान, पाणी वाटप, सरबत वाटप करत महामानवाची जयंती साजरी केली.
चांदिवली, संघर्षनगर येथे सर्व पक्ष संघटनांनी एकत्रित येत एक परिसर एक जयंतीचा संदेश देत भव्य दिव्य मिरवणुकीचे आयोजन केले होते. यावेळी लघुनाट्य, प्रबोधनात्मक कार्यक्रम आणि विविध संदेश फलकांच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार जनमानसात रुजवले गेले.
No comments yet.