ऑनलाईन मद्य खरेदी करून घरपोच पोहचण्याची नवीन सोय या लॉकडाऊनकाळात सुरु झाल्यामुळे मध्यप्रेमींची चांगलीच सोय झाली असतानाच, सायबर फसवणूक करणाऱ्यांनी या परिस्थितीचा फायदा उठविला आहे. दिवसेंदिवस या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, मुंबईतील पवई भागातील बहुमजली इमारतीत राहणारी ३८ वर्षीय महिला, जी एका खासगी कंपनीत वरिष्ठ कार्यकारी म्हणून काम करत आहे, ती सायबर फसवणुकीची शिकार ठरली आहे.
सवलतीच्या दरात ब्रँडेड शॅम्पेनची बाटली खरेदी करण्याचा प्रयत्न करत असताना एका ऑनलाइन व्यवहारामध्ये तिला ६२,००० रुपये गमवावे लागले आहेत. तिच्या परिसरात असणाऱ्या जवळच्या वाईन शॉपच्या नावाने ही जाहिरात करण्यात आली होती. यालाच सायबर क्राइममध्ये “सर्च इंजिन लिस्टिंग फ्रॉड” असे म्हटले जाते.
कोरोना महामारीमुळे लोक विनाकारण घराबाहेर पडणे टाळत आहेत. त्यातच बऱ्याच व्यावसायिकांनी आपला व्यवसाय ऑनलाईन आणत घरपोच सेवा देणे सुरु केले आहे. यामुळे मद्य सुद्धा ऑनलाईन मागवणे सहज शक्य झाले आहे.
सोमवारी पवई येथील हिरानंदानी गार्डन भागात असणाऱ्या ‘वाईन शॉप’साठी येथेच राहणाऱ्या एका महिलेने वेबवर सर्च केले होते. यावेळी तिला तिच्या घराजवळच असणाऱ्या एका शॉपमध्ये ब्रँडेड शॅपेनवर ७०० रुपये सवलत देणारी एक जाहिरात आढळली. या ऑफरने मोहित होऊन तिने तिथे दिलेल्या नंबरवर ऑर्डर देण्यासाठी त्यांना कॉल केला. प्रकाश शर्मा नावाच्या व्यक्तीने तिच्या कॉलला उत्तर दिले आणि सदर दुकानातील व्यवस्थापक म्हणून स्वत:चा परिचय करून दिला.
ऑर्डर देताच दुकानदार रूपात तिच्याशी संवाद साधणाऱ्या व्यक्तीने तिला १००० रुपये संपूर्ण रक्कम एकाच वेळी देण्यास सांगितले. तिने मी ई-वॉलेटद्वारे पैसे देते असे सांगताच, आमच्याकडे ई-वॉलेट पर्याय नाही; त्याऐवजी तिला तिचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड तपशील मागितले.
“आपली फसवणूक होत आहे याची जाणीव सुद्धा नसणाऱ्या महिलेने नि:संदेह नाव, जन्मतारीख, समाप्ती तारीख आणि सीव्हीव्ही नंबर यासारखे सर्व कार्ड तपशील समोरील व्यक्तीला दिले. काही वेळातच समोरील व्यक्तीने १००० रुपये किंमतीचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी आलेला ओटीपी देण्याची विनंती केली. तिच्या ऑर्डरवर जवळजवळ ४०% सूट मिळविण्याच्या उत्तेजनामुळे तिने त्याला ओटीपी दिला आणि व्यवहार सुरळीत पार पडला,” असे याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.
सर्च इंजिन लिस्टिंग फ्रॉड
कॉल संपवतानाच त्या व्यक्तीने महिलेला पेमेंट प्रक्रिया बंद करण्यासाठी आणखी एक ओटीपी आला असेल तो देण्याची मागणी केली. व्यवहाराकडे लक्ष न घेता महिलेने आलेला दुसरा ओटीपी देखील त्याला दिला आणि अचानक तिच्या खात्यातून ६१,००० रुपये डेबिट झाले. तिने त्याला पैसे परत मागितले तेव्हा त्याने तिला पैसे परत करण्यासाठी आणखी एक ओटीपी आला असेल तो देण्याची मागणी केली. यावेळी तिने पाहिले असता तिच्या खात्यातून आणखी एक ५१,००० रुपये डेबिट करण्यासाठी ओटीपी तयार करण्यात आल्याचे तिच्या लक्षात आले. तिने त्वरित कॉल डिस्कनेक्ट करत तिच्या जवळपासच असणाऱ्या त्या वाईन शॉपवर जात व्यवहाराबद्दल तक्रार केली आणि परतावा मागितला. मात्र असा कोणताच व्यवहार त्या दुकानाशी झाला नसून, आपली फसवणूक झाली असल्याचे तिच्या लक्षात येताच तिला धक्काच बसला.
महिलेने याबाबत पवई पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. “बर्याच लोकांची अलीकडे अशाच प्रकारच्या फसवणूक करण्यात आली आहे. या वाईनशॉपच्या नावे अनेक तक्रारी आमच्याकडे नोंद होत आहेत. आम्ही नागरिकांना वारंवार सूचना देत असून, अशा अनोळखी ठिकाणी मिळालेल्या क्रमांक आणि लिंकवर व्यवहार टाळावेत अशा सूचना करूनही नागरिक सायबर फसवणुकीला बळी पडत आहेत,” असे याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.
“पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायबर गुन्हेगारी हे सर्वात मोठे आवाहन पोलिसांसमोर आहे. विशेष म्हणजे सुशिक्षित आणि उच्चभ्रू वस्तीत राहणारे नागरिक याला सर्वांत जास्त बळी पडत आहेत,” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (प्रभारी) विजय दळवी यांनी आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा.
No comments yet.