गौरव शर्मा | पवईतील पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी आनंदाची बातमी आहे. पालकांच्या मागणीचा विचार करता शाळेचे विश्वस्त आणि शाळा प्रशासनाच्या झालेल्या बैठकीत येथे शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यावर्षीच्या शैक्षणिक शुल्कात २५% सूट देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क २५ टक्के कमी करणारी पवई इंग्लिश हायस्कूल पहिली खासगी शाळा ठरली आहे. २८ फेब्रुवारी पर्यंत पहिल्या सत्राचे शैक्षणिक शुल्क भरणाऱ्या विद्यार्थ्यांना ही सूट लागू होणार आहे.
कोरोनाव्हायरस या साथीच्या रोगाने सर्वत्र थैमान घातल्याने शाळा आणि विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग स्विकारावा लागला आहे. या साथीच्या आजाराच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय ठप्प झाले, मानधन कमी झाले. त्यातच ऑनलाईन शिक्षणामुळे पालकांचे मुलांच्या शिक्षणावरील खर्च वाढलेले असतानाच शालेय पायाभूत सुविधांचा कोणताही विशेष उपयोग न करता पूर्ण शैक्षणिक शुल्क भरावे लागत असल्याने महाराष्ट्रातील पालकांनी विरोध दर्शवत शालेय फी कमी करण्याची मागणी केली होती.
पालकांनी मोठ्या संख्येने विनवणी व याचिका करूनही फी कमी करण्याचे कोणतेही निर्देश किंवा आदेश सरकारने दिले नव्हते. मात्र न्यायालयाने खासगी विनाअनुदानित शाळांना हप्त्यांमध्ये आणि ऑनलाईन शुल्क भरण्याचा पर्याय देण्याबाबत विचार करण्याचे निर्देश दिले होते.
शैक्षणिक शुल्कात २५ टक्के सूट देण्याचा निर्णय
तथापि २ फेब्रुवारी रोजी पवई इंग्लिश हायस्कूलच्या विश्वस्त आणि प्रशासनाच्या झालेल्या बैठकीत पवईतील पालकांनी केलेल्या मागणीचा विचार करत शैक्षणिक शुल्कात २५ टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. “पालक, सामाजिक कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक चंदन शर्मा यांनी साथीच्या आजारामुळे पालकांवर मोठा आर्थिक आणि मानसिक ताण पडत आहे, यामुळे शैक्षणिक शुल्कात कपात करण्याची मागणी केली होती. आम्ही सर्व विश्वस्तांसमवेत बैठक घेतली आणि एकूण परिस्थिती व पालकांसाठी निर्माण झालेल्या अडचणी पाहता आम्ही २५% शैक्षणिक शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. २८ तारखेपर्यंत शैक्षणिक शुल्क भरणाऱ्यांना ही सवलत मिळणार आहे,” असे याबाबत बोलताना विश्वस्त प्रशांत शर्मा यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, “ज्यांनी यापूर्वी रक्कम भरली आहे त्यांना दुसऱ्या सत्रात आणि ज्यांनी पूर्ण वर्षाचे शुल्क भरले आहे त्यांना पुढील शैक्षणिक वर्षात सूट मिळेल.”
पालकांवर मोठा आर्थिक आणि मानसिक ताण असतानाच ही कपात त्यांना दिलासा देणारी ठरणार आहे, असे मत पालक-शिक्षक संघटनेकडून व्यक्त होत आहे.
No comments yet.