पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या महिलांनी त्या कुठेच कमी नसल्याचे दाखवून दिले आहे. असेच दोन महिलांचे धाडसी काम बुधवारी पवईतील हिरानंदानी भागात पाहायला मिळाले. येथे गस्तीवर असणाऱ्या महिला कमांडोनी संपूर्ण मुंबईत धुमाकूळ घालणाऱ्या लॅपटॉप चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
रमजान मोहमद सय्यद (२६) आणि विशाल भरत काळे (३५) अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून १.५ लाख किंमतीचे लॅपटॉप हस्तगत केले आहेत.
मुलुंड येथे राहणारे कुणाल भट बुधवारी कामानिमित्त पवईतील हिरानंदानी भागात आले होते. संध्याकाळी ६.२० वाजण्याच्या सुमारास येथील एचडीएफसी बँकेजवळ आपली कार पार्क करून आपल्या एका सहकाऱ्यासोबत ते समोरच असणाऱ्या स्नॅक कॉर्नरवर गेले असताना त्यांच्या कारमध्ये कोणीतरी प्रवेश करत असल्याचे त्यांच्यासोबत असणाऱ्या सहकाऱ्याला दिसले. त्यांनी चोर-चोर ओरडतच कारकडे धाव घेतली.
“यावेळी या परिसरात गस्तीवर असणाऱ्या आमच्या महिला कमांडोनी महिलेचा ओरडण्याचा आवाज ऐकून तिकडे धाव घेतली असता लॅपटॉप बँग घेवून पळत असणाऱ्या एका इसमाच्या मागे ती महिला पळताना दिसली. दोन्ही महिला कमांडोनी क्षणाचाही विलंब न करता मोटारसायकलवर बसण्याच्या तयारीत असणाऱ्या त्या चोरट्याला आणि त्याच्या साथीदाराला पकडले.” असे याबाबत बोलताना हिरानंदानी कमांडोच्यावतीने सांगण्यात आले.
पकडण्यात आलेल्या त्या दोघा चोरट्यांना पवई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, ते अधिक तपास करत आहेत.
“पकडलेले दोन्ही आरोपी हे सराईत चोरटे असून, वडाळा येथील राहणारे इसम आहेत. त्यांच्या विरोधात मुंबईतील विविध भागात चोरीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. मंगळवारी सुद्धा या चोरट्यांनी हिरानंदानी येथील व्हेलेन्सिया इमारतीबाहेर पार्क एका गाडीतून एक मॅकबुक आणि एक आय पॅड चोरी केले होते.” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.
बुधवारी त्यांनी कपाडिया यांच्या कारची डाव्या बाजूची पाठीमागील खिडकीची काच फोडून २ मॅकबुक आणि एक लेनोवा कंपनीचा लॅपटॉप चोरी केला होता. मात्र ते पळून जाण्याच्या तयारीत असतानाच त्यांच्या मुसक्या आवळल्या.
मोडस ऑपरेण्डी
हे लॅपटॉप चोर मोटारसायकलवरून फिरून परिसरात पार्क केलेल्या कारमधील पाठीमागील सीटवर लॅपटॉप किंवा किंमती वस्तू ठेवली आहे का? याची पाहणी करतात. त्यानंतर मोटारसायकलवर पाठीमागे बसलेला व्यक्ती त्या गाडीच्या आसपास कुणी नाही हे पाहून आपल्या जवळील स्क्रूडायव्हर काचेच्या खालील भागात घुसवून एक झटक्यात खिडकीला असणारी काच फोडून टाकतो आणि कारच्या सीटवर पडलेली किंमती वस्तू घेवून गाडीवरून दोघे पसार होतात. ही सर्व प्रक्रिया ते केवळ दीड ते दोन मिनिटात करून पसार होत असल्याने त्यांना पकडणे पोलिसांसाठी एक आवाहनच होते.
No comments yet.