मॉलमध्ये कुत्र्यासोबत गैरकृत्य केल्याप्रकरणी एका २८ वर्षीय फूड डिलिव्हरी बॉयला शनिवारी पवई पोलिसांनी अटक केली आहे. पवई परिसरात घडलेली ही अशाप्रकारची दुसरी घटना आहे. अॅनिमल अॅक्टिव्हिस्ट आणि बॉम्बे अॅनिमल राइट्स एनजीओच्या सदस्या मिनू शेठ यांनी दिलेल्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी आरोपी डिलिव्हरी बॉय आकाश मोरे याला बेड्या ठोकल्या आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पवईतील हिरा पन्ना मॉलच्या दुसऱ्या मजल्यावरील बाल्कनीच्या आवारात कुत्र्यासोबत गैरकृत्य करताना दुसऱ्या डिलिव्हरी बॉयने त्याचा व्हिडिओ बनवून तो आपल्या सहकाऱ्यांना आणि इतर ओळखीच्या लोकांना पाठवला होता.
हा व्हिडिओ बघता बघता अनेक मुंबईकरांपर्यंत पोहचला. अॅनिमल अॅक्टिव्हिस्ट विजय मोहनानी यांना हा व्हिडीओ मिळताच त्यांनी पवई परिसरातील भटक्या कुत्र्यांना खायला देणाऱ्या शेठ यांना याबाबत पोलिसात तक्रार करण्यास सांगितले.
“मॉलमध्ये रेस्टॉरंट कर्मचारी कुत्र्यांना खायला देत असल्याने येथे कुत्र्यांचा वावर असतो. तसेच विविध परिसरात फूड डिलिव्हरी करणाऱ्या मुलांची सुद्धा येथे वर्दळ असते. त्यामुळे येथील बऱ्याच कुत्र्यांशी त्यांची मैत्री होते. याचाच फायदा घेत आरोपीने हे कृत्य केले आहे,” असे पोलिसांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले “कुत्र्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, त्याच्या खाजगी भागात सूज असल्याचे वैद्यकीय तपासणीत आढळून आले आहे.”
पवई परिसरात अशी ही दुसरी घटना आहे. गेल्या वर्षी पवईत नुरी नामक कुत्रीसोबत येथील एका स्वीट शॉपमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीने गैरकृत्य करत, तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये काठी घुसवून गंभीर जखमी केले होते.
“आम्ही आरोपीविरुद्ध भादवि कलम ३७७ (अनैसर्गिक कृत्य) आणि प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा, १९६० कलम १ (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवून शनिवारी त्याला अटक केली आहे. रविवारी त्याला सुट्टीच्या न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे” असे पवई पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
No comments yet.