सवंगड्यांची साद, वाय उच्चारण अन् घुंगरांच्या आवाजाचा आधार; पवईत रंगली अंध फुटबॉल प्रदर्शनी

बॉलमध्ये घुंगरू…. घुंगराच्या दिशेने धावणारे खेळाडू…. आपल्या सवंगड्याच्या आवाजाच्या दिशेने आलेल्या आवाजाचा अंदाज घेत केलेला पास… मग केलेला गोल…. आणि झालेला जल्लोष. हे वातावरण पाहिल्यावर एखादे सरावलेले फुटबॉलपटू खेळ खेळत आहेत, असेच सर्वांना वाटेल. परंतु हे सर्व चित्र पाहायला मिळत होते पवई येथील अंध फुटबॉल सामन्यात.

पवईतील महानगरपालिका मैदानात दि राईट शॉटतर्फे महिलांच्या अंध फुटबॉल प्रदर्शनी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. टीआरएसचे संचालक अल्विन रॉड्रिग्ज आणि ऑपरेशन प्रमुख संतोष हीतने यांनी सामन्याचे आयोजन केले होते. या प्रदर्शनी स्पर्धेचे उद्घाटन आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केले.

यावेळी प्रशिक्षक (कोच) विक्रम आणि ऋषीकेश यांच्या मार्गदर्शनाखाली इंडिया ‘अ’ टीम तर्फे केरेन (तमिळनाडू),  दीपाली कांबळे (महाराष्ट्र), दीपाली पवार (महाराष्ट्र), कोमल गायकवाड (महाराष्ट्र), पद्मिनी तुडू (ओडिशा), शाहिस्ता बेगम (कर्नाटक), सविता वाडीले (महाराष्ट्र) यांनी सहभाग घेतला. तर प्रशिक्षक डियो आणि रशद यांच्या मार्गदर्शनाखाली इंडिया ‘ब’ टीम तर्फे आर सी विजयलक्ष्मी (तमिळनाडू), भाग्यश्री रुग्गी (महाराष्ट्र), नीरमा ठाकरदा (गुजरात), मनसा (कर्नाटक), कंचन पटेल  ( मध्यप्रदेश), आशा चौधरी (गुजरात) यांनी भाग घेतला होता.

सहकाऱ्याचा आवाज लक्षात ठेवणे महत्त्वाचे बॉलमध्ये घुंगरू टाकून त्या आवाजाच्या दिशेने खेळाडू पळत असतात. आपल्या टीममधील सहकाऱ्यांच्या आवाजावर संपूर्ण खेळ आधारित असतो. यात प्रत्येक खेळाडूने सातत्याने ‘वाय’ शब्द उच्चारायचा असतो.

या सामन्यात इंडिया ‘अ’ टीमने नेत्रदीपक खेळ करत इंडिया ‘बी’ टीमवर १-० ने विजय मिळविला. ३० मिनीटे चाललेल्या या सामन्यात गोल कोण करणार आणि बाजी कोण मारेल, ही उत्सुकता सर्वांना होती. सरते शेवटी दीपाली कांबळे या महिला खेळाडूने अफलातून गोल मारत टीमला विजय मिळवून दिला. विशेष म्हणजे कोची येथे होणाऱ्या फुटबॉल सामन्यात हीच टीम जपान सोबत भिडणार आहे. यात पुरुषांच्या १० आणि महिल्यांच्या २ टीम भाग घेणार आहेत.

यावेळी अनिल गलगली, जसविंदर सिंगबिंदर, राज किरण सिंह, दिनेश देवाडिगा, रवि वर्मा, मधुकर इंगळे, रुचिरा इंगळे, रियाझ मुल्ला उपस्थित होते.

, , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!