एटीएम कार्डाची अदलाबदली करून करायचा फसवणूक; पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या; १३० एटीएम कार्ड जप्त

एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या लोकांना मदत करण्याच्या बहाण्याने बोलण्यात गुंतवून त्यांचे एटीएम कार्ड बदलून फसवणूक करणाऱ्या भामट्याला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तुफेल अहमद लाल मिया सिद्दिकी (३६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पवई पोलिसांनी त्याच्याकडून विविध बँकांची १३० एटीएम कार्ड सह एक बजाज पल्सर मोटरसाकल हस्तगत केले आहेत.

पवईत राहणारा रोशन कुमार सिंग हा तरुण पाठीमागील आठवड्यात साकीविहार येथील बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेला होता. पैसे काढत असतानाच तुफेल तिथे आला आणि त्याने रोशनला बोलण्यात गुंतवून त्याच्या जवळील एसबीआय बँकेच्या एटीएम कार्डची अदलाबदली केली.

रोशन घरी परतत असताना त्याच्या खात्यातून ५९ हजार रुपये काढल्याचा एसएमएस त्याला प्राप्त होताच त्याला धक्काच बसला. त्याने त्वरित बँकेत धाव घेतली असता त्याचे एटीएम डीटेल्स वापरून हे पैसे काढल्याचे समोर आले. आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच त्याने पवई पोलिसात धाव घेत याबाबत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला होता.

पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुधन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद पाटील, पोलीस हवालदार टिळेकर, पोलीस नाईक आदित्य झेंडे, अभिजित जाधव, पोलीस शिपाई संदीप सुरवाडे, प्रमोद पुरी आणि राठोड यांनी तपास सुरु केला. “तपासात एटीएम आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता अभिलेखावरील गुन्हेगार तुफेल हा फुटेजमध्ये एटीएममधून निघताना आढळून आला,” असे यासंदर्भात बोलताना सपोनि पाटील यांनी सांगितले.

त्या अनुषंगाने पोलिसांनी पवई, साकीनाका आणि साकीविहार रोड भागात ३ दिवस सतत पाळत ठेवून तोफेल याला साकीनाका परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने सदर गुन्ह्याची पोलिसांना कबुली दिली.

“अटक आरोपीकडून आम्ही १३० एटीएम कार्ड व गुन्ह्याच्या पैशातून खरेदी केलेली बजाज पल्सर मोटारसायकल हस्तगत केली आहे. तो अभिलेखावरील गुन्हेगार असून, त्याच्याविरोधात सांताक्रूझ, बोरीवलीसह मुंबईतील ७ पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे,” असे पवई पोलिसांनी सांगितले.

, , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!