पवईतील मिलिंदनगर येथील एक सोनार व त्याच्या कर्मचाऱ्याचे अपहरण करून त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने, पैसे आणि मोबाईल काढून घेत त्यांना बांधून मारहाण करून ठाणे येथे सोडून अपहरणकर्ते पसार झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. याबाबत पोलिसांनी अपहरण व जबरी चोरीचा गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे.
पवईतील चैतन्यनगर आयआयटी येथे राहणारे जितेश परमार यांचे मिलिंदनगर येथे सोन्याचे दुकान आहे. मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून दुकानातील कामगार प्रकाश सिंग याच्या सोबत दुचाकीवरून ते घरी चालले असताना जेव्हीएलआरवर मिलिंदनगर येथे पाठीमागून भरधाव आलेली एक कार त्यांच्या गाडीसमोर थांबली. तोंडाला रुमाल बांधलेले व हातात शस्त्रे असलेली ५ तरुण त्या गाडीतून उतरले आणि हत्याराच्या धाकाने त्यांनी परमार आणि सिंग यांचे अपहरण करून तेथून पळ काढला.
गाडीत बसताच आरोपींनी आम्हाला मारहाण करत आमचे हात बांधून व डोळ्यालाही पट्टी बांधली. ज्यानंतर त्यांनी आमच्याकडे असणारे सोन्याची चैन, ब्रेसलेट, अंगठी, पैसे व मोबाईल अशी १.८ लाखाच्या वस्तू जबरी हिसकावून घेतल्या. एक आरोपीने घटनास्थळावरून आमची मोटारसायकल सुद्धा पळवून नेली. संपूर्ण रात्रभर आम्हाला गाडीतून फिरवल्यानंतर डोळ्यावर बांधलेली पट्टी आणि बांधलेले हात अशा अवस्थेत ठाण्यातील घोडबंदर रोडवरील कृष्णा धाब्याजवळ चालत्या गाडीतून ढकलून देवून तेथून त्यांनी पोबारा केला. असे परमार याने पोलिसांना दिलेल्या जवाबात म्हटले आहे.
सुटका झाल्यानंतर परमार आणि सिंग यांनी पवई पोलिस ठाण्यात धाव घेवून घडलेली सर्व हकीकत कथन केली. “याबाबत आम्ही अपहरण व जबरी चोरीचा गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे. परिसरात मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने वेगवेगळ्या टिम तयार करून आम्ही त्या पाचही आरोपींचा शोध घेत आहोत” असे यासंदर्भात बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
ते पुढे म्हणाले, “या घटनेत त्यांच्या जवळच्या किंवा ओळखीच्या व्यक्तीचा हात असण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. आरोपी हे त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होते. पोलीस ठाण्यात झालेल्या व्यापाऱ्यांच्या बैठकीला सुद्धा त्या दिवशी तो हजर होता, त्यामुळे आम्ही त्याच्या जवळपास आणि संशयीत सर्व व्यक्तींवर नजर ठेवून आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारावर एक टिम गुजरात येथे सुद्धा रवाना झाली आहे. लवकरच यातील सर्व धागेदोरे उलगडतील.”
No comments yet.