राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था (निटी) मध्ये अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने, कॅपसमधील ‘गिल्बर्ट हॉल’ इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली. सुरभी शिवकुमार शर्मा असे विद्यार्थिनीचे नाव असून, परीक्षेच्या मानसिक तणावाखाली तिने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
मूळची चैन्नई येथील रहिवाशी असलेली सुरभी निटीमध्ये औद्योगिक अभियांत्रिकीचे पदव्युत्तर पदवीकेचे शिक्षण घेत होती. तिचा मोठा भाऊ सुद्धा याच संस्थेतून पाठीमागील वर्षी पदव्युत्तर पदवीधर झाला असून, तो तिला शैक्षणिक मार्गदर्शन करत होता. सर्व काही सुरळीत चालू असताना अभ्यासाच्या दबावामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले.
“गुरुवारी सकाळी ७.१५ वाजता सुरभी नेहमी प्रमाणे आपल्या मैत्रिणीं सोबत पूर्व परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर निघाली. काही वेळाने ‘माझी चावी राहिली आहे’, असे मैत्रिणींना सांगून ती परत फिरली. इमारतीच्या सहाव्या आणि सातव्या मजल्याच्या भागात असणाऱ्या जागेतून उडी मारून तिने आत्महत्या केली असल्याचे तिच्या मैत्रीणींनी जवाबात सांगितले आहे”, असे आवर्तन पवईशी बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाई म्हाडेश्वर यांनी सांगितले.
सफाई कर्मचाऱ्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेली मुलगी पाहताच संस्थेच्या अधिकाऱ्यांना कळवून होली स्पिरीट रुग्णालयात नेले असता तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
“संध्याकाळी तिचे नातेवाईक आल्यावर आम्ही त्यांचा जवाब नोंदवून घेतला आहे. ज्यानुसार ती गेली काही महिने अभ्यासाच्या तणावाखाली होती आणि त्याच तणावातून तिने आत्महत्या केली असल्याचे समोर येत आहे, असे आवर्तन पवईशी बोलताना तपासी अधिकाऱ्याने सांगितले.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.