चांदिवली येथील चांदिवली फार्म रोडवर डी पी रोड ९ कॉर्नरवर असणाऱ्या पालिकेच्या दुर्गादेवी शर्मा मराठी शाळेला बंद करण्याची नोटीस देण्यात आली होती. शाळेची इमारत कमकुवत झाली असून, शाळा जवळच असणाऱ्या पालिकेच्या दुसऱ्या शाळेत हलवण्याची सूचना या नोटिसीमधून केली आहे. याच्या विरोधात विद्यार्थी आणि पालकांनी केलेल्या आंदोलनानंतर आणि खासदार वर्षा गायकवाड यांच्या पुढाकारानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.
अनेक सामान्य कुटुंबातील मुले आपले भविष्य घडवण्याच्या आशेने चांदिवली येथील मराठी माध्यमाच्या दुर्गा देवी शर्मा मनपा शाळेत शिक्षण घेत आहेत. या शाळेत जवळपास २६० विद्यार्थी बालवाडी ते आठवी इयत्तेत शिक्षण घेत आहेत. मात्र शाळा अचानक बंद करण्याची नोटीस आल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये एकच आक्रोश निर्माण झाला.
“शाळेला लागूनच जेवीएलआरकडे जाणारा डीपी रोड ९ आहे. काही दिवसांपासून या रस्त्याचे काम सुरू झाले आहे. हे काम सुरु असताना येथे काम करत असणाऱ्या जेसीबीचा धक्का एका वर्गाच्या भिंतीला लागला आणि भिंतीचा काही भाग खचला. यानंतर बैठ्या स्थितीमध्ये असलेली ही संपूर्ण शाळा धोकादायक झाली असल्याचा ठपका ठेवत ही शाळा बंद करून दोन किमी लांब असलेल्या पालिकेच्या संघर्षनगर येथील दुसऱ्या शाळेत स्थलांतरित करण्याचे आदेश देण्यात आले.
यानंतर विद्यार्थी – पालक आक्रमक होत या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी एकत्रित येत या निर्णयाविरोधात शाळा वाचवण्यासाठी आंदोलन केले.
पालकांचा हा आक्रोश आमदार आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत पोहचल्यावर याची माहिती घेत ठाकरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले कि, “मुळात भिंत पडल्यावर संपूर्ण शाळा कशी काय बंद करू शकतो? यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य पणाला लागले आहे. मोक्याच्या जागा बघायच्या आणि त्या आपल्या विकासक मित्रांच्या घशात घालायच्या हा पॅटर्न सत्ताधारयानी सुरु केला आहे. कुणा विकासकासाठी आम्ही शाळा बंद पडू देणार नाही. चांदिवलीतील मराठी शाळा वाचलीच पाहिजे.”
स्थानिक खासदार वर्षा गायकवाड यांनी देखील याची दखल घेतली असून, याबाबत माहिती देताना त्या म्हणाल्या “मला सांगण्यास आनंद होत आहे की चांदिवली येथील दुर्गा देवी महानगरपालिका मराठी शाळा बंद केली जाणार नाही आणि विद्यार्थ्यांना स्थलांतरित केले जाणार नाही. सहा दशकांहून अधिक काळापासून अस्तित्वात असलेली ही मराठी शाळा बंद करण्याची सरकारची योजना आम्ही उधळून लावली आहे.”
त्या पुढे म्हणाल्या, “माझ्या कार्यालयाने महानगरपालिका सहाय्यक आयुक्त धनाजी हेर्लेकर आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांसह शाळेची तपासणी केली. या तपासणीदरम्यान, भेगा पडलेल्या वर्गाच्या भिंती तात्पुरत्या दुरुस्त करून शाळा पुन्हा सुरू करणे शक्य आहे हे स्पष्ट झाले. याशिवाय, शाळेचा स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल मागवला जाईल आणि उन्हाळी सुट्टीत शाळेची व्यापक दुरुस्ती केली जाईल. महानगरपालिकेने शाळा बंद करण्याचा आणि विद्यार्थ्यांना स्थलांतरित करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. हा निर्णय येथील पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सततच्या प्रयत्नांचे मोठे यश आहे.”
No comments yet.