साकीनाका पोलिसांची मोठी कारवाई: अंमली पदार्थांचा कारखाना उद्ध्वस्त; ७५ कोटींचा मुद्देमाल जप्त

मुंबई पोलिसांच्या साकीनाका अंमली पदार्थ विरोधी पथकाने आंतरराज्य ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करत एका मोठ्या कारखान्यावर छापा टाकला आहे. गुजरात राज्यातील नर्मदा जिल्ह्यातील राजपिपला (नांदोद) येथील एका भाड्याच्या घरात सुरू असलेला हा ‘मेफेड्रॉन’ (MD) ड्रग्ज बनवण्याच्या कारखाण्यावर धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल ७४ कोटी ९७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात साकीनाका परिसरातून झाली. अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवरील पेनिनसुला हॉटेलसमोर एक महिला ड्रग्ज विकण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती साकीनाका अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. “पोलिसांनी सापळा रचून मुस्कान समीर खान (वय २६, रा. साकीनाका) या महिला ओला-उबर चालकाला ताब्यात घेतले. तिच्या झडतीत पोलिसांना १०१ ग्रॅम मेफेड्रॉन ड्रग्ज सापडले,” असे सहाय्यक पोलीस आयुक्त (साकीनाका विभाग) प्रदिप मैराळे यांनी सांगितले.

मुस्कानची पोलिसांनी कसून चौकशी केली असता, तिने हे ड्रग्ज मुंब्रा (ठाणे) येथील वझुल कमर अबुल वफा चौधरी उर्फ पप्पू (वय ५६) याच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे पप्पूला शिळफाटा येथून अटक केली.

पप्पू हा केवळ ड्रग्ज विक्रेता नसून थेट उत्पादक निघाला. त्याने गुजरातच्या वरखड गावातील एका ओळखीच्या व्यक्तीचे घर भाड्याने घेऊन तिथे ड्रग्ज बनवण्याची प्रयोगशाळा सुरू केली होती. साकीनाका पोलिसांचे पथक तात्काळ गुजरातला रवाना झाले आणि त्यांनी तिथे छापा टाकला.

“या छाप्यात पोलिसांना २० किलोहून अधिक द्रवरूपी (Liquid) मेफेड्रॉन, तसेच ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारी ‘ब्रोमिन’ आणि ‘क्लोरोफॉर्म’ सारखी घातक रसायने सापडली. याशिवाय कारखान्यात वापरले जाणारे कमर्शियल फ्रीज, स्टीरर मशीन आणि हिटिंग मेटल यांसारखी उपकरणेही जप्त करण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या जप्त केलेल्या मालाची किंमत ७४.९७ कोटी रुपये आहे,” असे यासंदर्भात बोलताना पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले.

या कारवाईमुळे ड्रग्जच्या मुख्य पुरवठा साखळीला (सप्लाय चेन) मोठा हादरा बसला असून, पोलीस आता या रॅकेटमधील इतर साथीदारांचा शोध घेत आहेत.

पोलीस उपायुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) परिमंडळ-१०: दत्ता नलावडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (साकीनाका विभाग) प्रदिप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल यादव (साकीनाका पो. स्टे.), प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सपना क्षीरसागर (साकीनाका पो. स्टे.) याच्या नेतृत्वात पोनि. दिपक गिरमे, सपोनि. दयानंद वणवे, पोउनि. पंकज परदेशी, पो. हवा. शशिकांत पाटील, पो. हवा. चंद्रकांत पवार, पो. हवा. नितिन खैरमोडे, पो.शि. अनिल करांडे यांच्या पथकाने ही मोठी कामगिरी पार पाडली.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!