वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या वाहन चालकांमुळे येथे अपघात वाढल्याने निर्णय घेतल्याचे साकीनाका विभागाचे म्हणणे
आयआयटी, पवई येथील माधव अपार्टमेंट ते आयआयटी मेन गेटकडे जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडला जोडणाऱ्या अंतर्गत मार्गामध्ये वाहतूक पोलिसांनी बदल केल्याने स्थानिक नागरिकांमध्ये असंतोष आहे. अंतर्गत वस्तीमधून या मार्गाने बाहेर पडून गांधीनगरकडे जाणाऱ्या वाहनांना मोठा वळसा घालून पवई प्लाझा येथून यु-टर्न मारून जावे लागत असल्याने नागरिकांच्यामध्ये तीव्र नाराजी आहे. हा रस्ता पूर्ववत सुरू करण्यात यावा, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपविभागप्रमुख निलेश साळुंखे यांनी वाहतूक विभाग यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे. तर स्थानिक नगरसेवक चंदन शर्मा यांनी देखील हा मार्ग खुला करण्यासाठी शुक्रवारी संध्याकाळी या भागात ठिय्या आंदोलन केले.
या अंतर्गत मार्गाने आलेली वाहने वाहतूक नियमांचे उल्लंघन करत उलट दिशेने येत असल्याने या भागात अपघातांचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे या मार्गावरून मुख्य रस्त्यावर उजवे वळण प्रायोगिक तत्वावर बंद करण्यात आल्याचे साकीनाका वाहतूक विभागाने सांगितले.
या संदर्भात बोलताना स्थानिक नागरिकांनी सांगितले कि, पवई पॉली क्लिनिक, निहाल हॉस्पिटल, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, हिरानंदानी हॉस्पिटल असे अनेक रुग्णालये या भागात आहेत. आपत्ती काळात येथून बाहेर पडणाऱ्या रुग्णवाहिका या निर्णयामुळे वाहतूक कोंडीत अडकून पडून एखाद्या रुग्णाला आपला जीव गमवावा लागला तर त्याची जबाबदारी कोणाची असेल?
ते पुढे म्हणाले कि, “येथील अंतर्गत भागात पवई इंग्लिश हायस्कूल, ज्ञानमंदिर शाळा, पालिका शाळा, बॉम्बे पब्लिक शाळा, आयडियल हायस्कूल अशा अनेक शाळा आहेत. शाळेच्या बसेस आणि इतर वाहने देखील याच मार्गाने बाहेर पडून गांधीनगरच्या दिशेने जात असतात. या सर्व वाहनांना आता जवळपास २ ते ३ किलोमीटर जादाचे अंतर कापून प्रवास करावा लागणार आहे. वाहतूक कोंडीच्या काळात तर प्रवास आणखी त्रासदायक होणार आहे.
साकीनाका वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनी साळुंखे यांनी आवर्तन पवईशी बोलताना सांगितले की, “आम्ही कोणताही रस्ता बंद केलेला नाही. अंतर्गत वस्तीमधून येणाऱ्या या एकदिशा मार्गावरून येणारे वाहनचालक हे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून मुख्य रस्त्यावर (जेविएलआर) उजवे वळण घेवून विरुद्ध दिशेने गाडी चालवून मुख्य मार्गावरुन येणाऱ्या वाहतुकीत अडथळा निर्माण करून अपघात घडत असल्याने आम्ही हे उजवे वळण बंद केले आहे. हा निर्णय लागू झाल्यापासून आजपर्यंत एकही अपघात या भागात घडलेला नाही.”
अजून एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले कि, “यापूर्वी देखील हिरानंदानी, पवई विहार आणि इतर भागातून बाहेर येणारी वाहने एनटीपीसी सिग्नल भागात जेविएलआरवर उजवे वळण घेत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले होते. मात्र ते उजवे वळण बंद केल्यापासून त्या भागात अपघात बंद झाले आहेत.”
ते पुढे म्हणाले, “अंतर्गत वस्त्यांमधून बाहेर पडणारा हा एकमेव रस्ता नाही आहे. अजूनही इतर रस्ते आहेत. यातील एक मार्ग हा जेविएलआरकडे येणारा एकदिशा सरळ मार्ग आहे. अंतर्गत वस्त्यांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी या मार्गाचा वापर केला तर त्यांना मोठे वळण घेणे टाळता येणार आहे आणि वाहतुकीच्या नियमांचे देखील उल्लंघन होणार नाही. वाहनचालकांना नियम पाळण्याच्या सवयी लागाव्यात म्हणून देखील हा निर्णय महत्वाचा आहे. इतर मार्गावरील अडथळे, अतिक्रमण आणि अनधिकृत दुकाने हटवण्याची मागणी देखील आम्ही पालिकेकडे केली आहे, ज्यामुळे रस्ते वाहतुकीसाठी खुले होतील.”
वाहतूक विभागाच्या या निर्णयाविरोधात शिवसेना (उबाठ) उपविभागप्रमुख निलेश साळुंखे यांनी सहपोलीस आयुक्त (वाहतूक विभाग) यांना पत्राद्वारे तक्रार नोंदवत हा मार्ग खुला करण्याची मागणी केली आहे. लवकरात लवकर हा निर्णय झाला नाही तर आंदोलनाचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
तर स्थानिक नगरसेवक चंदन शर्मा यांनी देखील हा मार्ग खुला करण्यासाठी शुक्रवारी संध्याकाळी या भागात ठिय्या आंदोलन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, लोकप्रतिनिधी, स्थानिक नागरिक यांना विचारात न घेता साकीनाका वाहतूक विभागाने हा परस्पर निर्णय कसा घेतला? वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करायचे सोडून रस्ता बंद करणे हा कसला निर्णय.
चैतन्यनगर, तिरंदाज गावठाण, गोखले नगर, रमाबाई नगर, सायकल वाडी अशा अनेक लोकवस्त्या येथे आहेत. येथील हजारो रहिवाशांना कामानिमित्त जाताना, शाळा – कॉलेजेस जाताना या निर्णयाचा नाहक त्रास होत असून, वाहतूक विभागाने उद्देशपूर्व पवईकरांना कोंडीत पकडले आहे का? असाही प्रश्न यावेळी बोलताना स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
यावर उपाययोजना करण्यासाठी मंगळवारी पालिका, वाहतूक पोलीस आणि स्थानिक नागरिक यांची एक बैठक आयोजित करण्यात आली असून, या बैठकीत आता काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.




No comments yet.