पवई परिसरातील एका खळबळजनक खून प्रकरणाचा छडा लावण्यात मुंबई पोलिसांना मोठे यश आले आहे. तुंगा गाव परिसरात एका अज्ञात इसमाचा धारदार शस्त्राने भोसकून खून केल्यानंतर, पोलिसांची नजर चुकवण्यासाठी चक्क स्वतःचे केस कापून आणि वेश बदलून उत्तर प्रदेशात पळालेल्या मुख्य आरोपीला पवई पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. प्रमोद रामकृपाल वर्मा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
२४ मे २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास पवईतील साकीविहार रोडवरील ‘लोढा सुप्रिमस आऊटगेट’ जवळ एका अज्ञात व्यक्तीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळला होता. कोणातरी अज्ञात इसमाने त्याच्या छातीवर धारदार शस्त्राने वार करून त्याचा निर्घृण खून केला होता. या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेनुसार (BNS) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांचे ‘मिशन उत्तर प्रदेश’
मृत व्यक्ती फुटपाथवर राहत असल्याने सुरुवातीला त्याची ओळख पटवणे आणि खुनाचा हेतू शोधणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. तपासादरम्यान त्याचे नाव केवळ ‘युसुफ’ एवढेच समजले. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांची तब्बल ८ पथके तयार करण्यात आली.
तपास पथकाने परिसरातील १०० ते ११० सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे तपासले आणि २५ ते ३० संशयितांची कसून चौकशी केली. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांना समजले की यात दोन जणांचा हात असून मुख्य आरोपी थेट परराज्यात पळून गेला आहे.
केस कापले, वेश बदलला, तरीही पोलिसांना चकवू शकला नाही
मुख्य आरोपीने आपली ओळख लपवण्यासाठी स्वतःचे केस कापले आणि कपडे बदलून वेश पालट केला होता. मात्र, पोलिसांचे पथक त्याचा माग काढत थेट उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात पोहोचले. तेथील सुदामपुरी (अतारा) भागातून पोलिसांनी प्रमोद रामकृपाल वर्मा (वय २४) या मुख्य आरोपीला अत्यंत हुशारीने ताब्यात घेतले.
खुनाचे कारण:
पोलिसी खाक्या दाखवताच प्रमोदने गुन्ह्याची कबुली दिली. जुन्या भांडणाचा राग मनात धरून त्याने त्याचा साथीदार दीपक उर्फ दिपू नथुप्रसाद वर्मा (वय २६) याच्या मदतीने युसुफचा खून केल्याचे कबूल केले.
गुन्ह्यातील दुसरा आरोपी दीपक उर्फ दिपू वर्मा याला गुन्हे शाखेने गुजरात येथून ताब्यात घेतले असून, पवई पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.
सदरची कामगिरी, दत्ता नलावडे (पोलीस उपायुक्त परिमंडळ १०), प्रदिप मैराळे (सहाय्यक पोलीस आयुक्त, साकिनाका विभाग), जितेंद्र सोनवणे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पवई पोलीस ठाणे) यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि सुशांत बंडगर (गुन्हे), पोनि जयदिप गोसावी, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि संतोष कांबळे, पोउपनि यश पालवे (एमआयडीसी पो. ठाणे), सागर पवार (मेघवाडी पो. ठाणे), पोउपनि गणेश आव्हाड, राकेश नलावडे, प्रशांत केंद्रे, सुहास कांदे (साकिनाका पो. ठाणे), मनोज भोसले (मेघवाडी पो. ठाणे) तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोह तानाजी टिळकेकर, रमेश नलावडे, मारुती सुरनार, जयदेव चव्हाण, अजिंक्य झेंडे, संदिप सुरवाडे, विकास वाघचौरे, बाबू येडगे (एमआयडीसी पो.ठाणे), अक्षय सातपुते (मेघवाडी पो. ठाणे), पोशि सदाशिव वारंग, संदिप राठोड, सूर्यकांत शेट्टी, अर्जुन राठोड, प्रदिप शिरसाट, दिनेश बदे, प्रविण जाधव (एमआयडीसी पो. ठाणे), पोह विशाल पिसाळ (तांत्रिक मदत) यांनी केली आहे.



No comments yet.