पवई, उपेंद्र त्रिपाठी मार्गाचा प्रश्न मिटणार; पालिका, वाहतूक विभाग आणि नागरिकांच्या एकमताने निर्णय

आयआयटी, पवई येथील माधव अपार्टमेंट समोरून आयआयटी मेनगेटकडे जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडला जोडणाऱ्या उपेंद्र त्रिपाठी (अंतर्गत) मार्गामध्ये वाहतूक पोलिसांनी बदल केल्याने स्थानिक नागरिकांमध्ये असंतोष आहे. यासंदर्भात विविध पक्षाने आंदोलन आणि निषेध मोर्चा काढत हा मुद्दा लावून धरला होता. जवळपास आठवडाभर चाललेल्या नाट्य सत्रानंतर अखेर यावर तोडगा निघाला असून, लवकरच हा प्रश्न मिटणार असल्याची चिन्हे आहेत.

मंगळवारी पालिका अधिकारी, वाहतूक पोलीस आणि नगरसेवक यांच्यात झालेल्या बैठकीनंतर यावर काही उपाय योजना सुचवण्यात आल्या आहेत.

आयआयटी परिसरात असणाऱ्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना जेविएलआरशी जोडणारा उपेंद्र त्रिपाठी मार्ग हा एक महत्वाचा दुवा आहे. मात्र या अंतर्गत मार्गाने आलेली वाहने वाहतूक नियमांचे उल्लंघन करत उलट दिशेने येत असल्याने या भागात अपघातांचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे या मार्गावरील जेविएलआर मार्गावर उजवे वळण साकीनाका वाहतूक विभागाच्यावतीने प्रायोगिक तत्वावर बंद करण्यात आले आहे.

या भागात अनेक रुग्णालये, शाळा आहेत तसेच परिसरातील इतर रस्ते हे पुरेसे मोठे नसल्याने सर्व वाहने याच मार्गाने बाहेर पडून आपआपल्या मार्गाने जात असतात. मात्र या मार्गावरील उजवे वळण बंद केल्याने जवळपास २ किमी जास्त अंतर कापून लोकांना प्रवास करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. यासंदर्भात विविध पक्षांनी पुढाकार घेत वाहतूक विभागाशी चर्चा केली मात्र निर्णय पाठी घेतला जात नसल्याने सर्वपक्षाने आंदोलने देखील केली.

अखेर मंगळवारी पालिका अधिकारी, वाहतूक पोलीस आणि नगरसेवक यांच्यात झालेल्या बैठकीनंतर यावर काही उपाय योजना सुचवण्यात आल्या आहेत.

“बैठकीत आम्ही या भागात अपघात होत असल्याने उजवे वळण बंद करणे आवश्यक असून, वाहतूक विभाग या निर्णयावर ठाम असल्याचे मत मांडले होते. मात्र येथील वाहतुकीचा सिग्नल हलवून काही फुट मागे उपेंद्र त्रिपाठी मार्गासमोर आणला तर हा प्रश्न मिटू शकतो, असा प्रस्ताव पालिकेसमोर ठेवला होता,” असे यासंदर्भात बोलताना साकीनाका वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनी साळुंखे यांनी आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या, “पालिकेने देखील आमच्या या प्रस्तावाला हिरवा दिवा दिला आहे. बुधवारी पालिका कर्मचारी यांनी या भागात पाहणी करून सिग्नल सरकवण्यासाठी आवश्यक सगळे मोज-माप घेतले आहे. येत्या ८ ते १० दिवसात सिग्नल हलवण्यासोबतच दुभाजक (डीवायडर) तोडून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात येणार आहे. यामुळे अंतर्गत मार्गावरून येणारी वाहने उजवीकडे वळण न-घेता सरळ जेविएलआरवर येऊन उजवे वळण घेवून गांधीनगरकडे जाऊ शकणार आहेत.”

पोलीस उपायुक्त पूर्व उपनगर प्रदीप चव्हाण यांनी देखील बुधवारी या परिसराला भेट देवून समस्या समजून घेतली. तसेच घेण्यात आलेल्या नवीन निर्णयाबद्दल जागेची पाहणी करून, साकीनाका विभागाला आवश्यक त्या सूचना केल्या आहेत.

यासंदर्भात बोलताना स्थानिक नगरसेवक चंदन शर्मा यांनी सांगितले कि, “मुलुंड येथे पालिका अधिकारी, वाहतूक विभाग आणि नगरसेवक यांच्या झालेल्या बैठकीत हा मुद्दा मी लावून धरला. नागरिकांच्या समस्या बैठकीत मांडून यावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली. पालिकेकडून आवश्यक त्या परवानग्या वाहतूक विभागाला देण्यासह कारवाई करण्याची मागणी केली. अखेर आता त्याला यश मिळाले आहे. सिग्नल थोडा पाठीमागे घेवून, डीवायडर हटवून रस्ता खुला केला जाणार आहे. नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा क्रोसिंग बनवण्यात येईल. नागरिकांच्या समस्येला सोडवण्यासाठी त्यांचा हा नगरसेवक यशस्वी झाला आहे याचे मला समाधान आहे.”

या समस्येवर मार्ग निघाला असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र हा निर्णय केवळ आश्वासन राहिल्यास आणि पावसाळ्यापूर्वी रस्ता खुला न झाल्यास मोठे आंदोलन करणार असल्याचे सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यानी याबाबत बोलताना सांगितले.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!