मुंबईवर झालेल्या २६/११ च्या भीषण हल्ल्याला यावर्षी १० वर्षं पूर्ण झाली. या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी, सैन्यदलातील जवान आणि नागरिकांना पवई पोलीस फ्रेंड्सच्या वतीने आयआयटी पवई येथे श्रद्धांजली वाहण्यात आली. ऑल मुंबई असोसिएशन फॉर स्पोर्ट्स अँड फिटनेस फॉर ऑल, राष्ट्रीय एकता संघ, महाराष्ट्र पोलीस संघटना महा. राज्य यांच्यावतीने आयआयटी, पवई पोलीस बिट चौकीजवळ श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसह, स्थानिक नगरसेविका वैशाली पाटील, नामनिर्देशित नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी आणि पवईकर उपस्थित होते.
‘२६ नोव्हेंबर २००८, त्या रात्री मुंबईवर झालेल्या हल्ल्याला कोण विसरु शकतो. आपल्या सुरक्षा यंत्रणांसाठी हा असा प्रथम अनुभव होता. तीन दिवस मुंबईकर केवळ टीव्ही समोर बसून होता. अशात मुंबई पोलिसांनी दाखवलेले शौर्य खरंच वाखाण्याजोगे आहे. या हल्ल्यात मुंबई पोलीस दलाने आणि मुंबईकरांनी चांगले अधिकारी आणि कर्मचारी गमावले ज्यांची उणीव कधीच भरून न-येणारी आहे, त्यांना विसरणेही शक्य नाही. श्रद्धांजलीच्या रूपात त्यांच्या त्या शौर्याला आम्ही आज सलाम केला आहे’ असे याबाबत बोलताना वैशाली पाटील यांनी सांगितले.
No comments yet.