पवई आणि आसपासच्या परिसरातून महागड्या सायकल चोरी करणाऱ्या चोरट्याला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पवई पोलिसांनी त्याच्याकडून ११ मे रोजी चोरी केलेली एक महागडी सायकल सुद्धा हस्तगत केली आहे. अश्विन ईश्वरलाल मोहिते (१९ वर्ष) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कनाकीया रेंनफॉरेस्ट सोसायटी, येथे राहणारे ४३ वर्षीय फिर्यादी भिमाजी वोरा यांची फायरफॉक्स कंपनीची अंदाजे ३५ हजार रुपये किंमतीची, न्युक-२९ मॉडेल सायकल ११ मे रोजी चोरीला गेलेबाबत त्यांनी पवई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार भादवि कलम ३७९ अनव्ये गुन्हा नोंद करून पवई पोलीस अधिक तपास करत होते.
या अनुषंगाने पवई पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून ११ मे सायंकाळी ७ ते १२ मे सकाळी १० या वेळेतील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले असता एक तरुण त्यांना ती सायकल चोरून घेवून जाताना दिसून आला होता.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलिसांनी चोरट्याची माहिती मिळवण्यासाठी खबरीना कामाला लावले होते. “आमचे पथक तपास करत असताना त्याच परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने ती सायकल चोरल्याची माहिती आमच्या गुप्त बातमीदाराने दिली होती. तरुणाला ताब्यात घेवून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेली सायकल हस्तगत करण्यात आली आहे,” असे याबाबत बोलताना गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलिस उपनिरिक्षक विनोद लाड यांनी सांगितले.
No comments yet.