पवई येथील हिरानंदानी परिसरातील एका हॉटेलवर गुरुवार, १३ मार्चला पवई पोलिसांनी छापा टाकून वेश्या व्यवसायात अडकलेल्या ४ नवोदित अभिनेत्रींची सुटका केली आहे. सोबतच तरुणींना वेश्या व्यवसायासाठी भाग पाडणाऱ्या ६० वर्षीय दलाल श्यामसुंदर बन्सीलाल आरोरा (६०) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सुटका करण्यात आलेल्या चारही तरुणींना देवनार येथील महिला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
पवई परिसरात देहव्यापार चालवणारी एक टोळी कार्यरत असल्याची खात्रीलायक माहिती पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांना प्राप्त झाली होती. याबाबत शहानिशा केल्यावर गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुर्यकांत पारटकर, पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील, पो.ह बाबू येडगे, पो.ह. संदीप सुरवाडे, म.पो.शि. पवार, म.पो.शि. सोनकांबळे, म.पो.शि. तागडे यांचे एक पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले.
कारवाईसाठी बोगस ग्राहक तयार करून दलाल श्याम आरोरा यास संपर्क साधला असता त्याने मुली उपलब्ध करून देण्याचे सांगून ४ मुलींचे फोटो व्हाटसअपवर पाठवले आणि मोबदला म्हणून ३ लाख रुपये लागतील असे सांगितले. बोगस ग्राहकाने पोलिसांच्या सूचनेनुसार त्याला हिरानंदानी येथील एका हॉटेलमध्ये येण्यास सांगितले.
पवई पोलिसांनी दोन पथके तयार करून एक पथक बोगस ग्राहकाच्या सोबत हॉटेलच्या आतमध्ये तर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वात दुसरे पथक हे हॉटेलच्या बाहेरील परिसरात संशय येणार नाही अशा रीतीने पाळत ठेवून होते. दुपारी १.२५ वाजताच्या सुमारास एक इसम ४ तरुणींसह हॉटेलमध्ये आला आणि बोगस ग्राहक याला तरुणींची निवड करण्यास सांगून ३ लाख रुपयांच्या रक्कमेची मागणी केली.
“पोलीस पथकाने ५०० रुपयांची एक आणि मुलांच्या खेळण्यातील ९९ खोट्या नोटा अशा प्रकारे तयार केलेले पैशांचे ६ बंडल एका छोट्या पिशवीत टाकून बोगस ग्राहकाकडे दिले होते. ती पिशवी अरोरा याच्या ताब्यात देताच त्या ग्राहकाने हॉटेलमध्ये असणाऱ्या पोलीस पथकाला इशारा करताच त्या पथकाने बाहेरील पथकाला इशारा केला आणि संपूर्ण पथकाने छापा टाकत आरोरा याच्यासह ४ तरुणींना ताब्यात घेतले,” असे पवई पोलिसांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “आरोरा याच्या अंगझडतीत पथकाला ५०० रुपयाची १ नोट व मुलांच्या खेळण्यातील ९९ खोट्या नोटांचे मिळून तयार केलेले ६ बंडल, एक मोबाईल फोन व रोख रक्कम रुपये १५० मिळून आले. तर ४ तरुणींजवळ मिळून ८ एपल कंपनीचे महागडे मोबाईल आणि नोकीया कंपनीचा फोन आणि रोख रक्कम ५५२० रुपये मिळून आले आहेत.”
“चारही तरुणी २६ ते ३५ वर्ष वयोगटातील असून, मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री व मॉडेलिंग करणाऱ्या आहेत. आरोरा हा ५०% रक्कम स्वतः ठेवून उर्वरित ५०% रक्कम तरुणींना देत असे. तरुणींची सुटका करून महिला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे,” असे तपासी अधिकाऱ्याने सांगितले.
भारतीय न्याय संहिता कलम १४३ (२) सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ४,५ अन्वये गुन्हा नोंद करून आरोरा याचा चारकोप येथे राहणारा साथीदार गौरव याचा शोध घेत आहेत.
No comments yet.