चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी; ‘जी-पे’वर घेतले जबरी चोरीचे पैसे

आयआयटी मुंबईमध्ये (IIT Mumbai) शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला दोन अनोळखी इसमांनी चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी (Robbery) केल्याची घटना पवईत घडली. विशेष म्हणजे जबरी चोरीची रक्कम आरोपींनी आपल्या ‘जी-पे’ (google pay) अकाऊंटवर घेतली होती. पवई पोलिसांनी (Powai police) काही तासातच या गुन्ह्यात दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

आयुष राजभर (वय १९ वर्ष) आणि सतिश यादव (वय २१ वर्ष) दोघेही राहणार निटी, पवई अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक आरोपींविरोधात अजूनही अशाच काही घटना समोर येत आहेत.

फिर्यादी गणेश शेशादी (वय २६) हा आयआयटीमध्ये एम.बी.एच्या दुसऱ्या वर्षात शिकत असून, येथील हॉस्टेलमध्ये (IIT Hostel) गेल्या दोन वर्षापासून राहत आहे. शेशादी २९ जानेवारी रोजी ५.३० वाजताच्या दरम्यान त्याच्या मित्राला भेटण्यासाठी जात होता. कैलासनगर जवळील पाईप लाईन रोड (रेनिसन्स हॉटेलच्या पाठीमागे) येथे आला असताना दोन अनोळखी इसमांनी त्याला चाकूचा धाक दाखवून अडवले आणि त्याच्या खिशातून जबरीने ७०० रुपये रोकड काढून घेतली.

यातील एका इसमाने माझा फोन हिसकावून घेत त्याचे लॉक मला खोलण्यास सांगितले. तसेच मोबाईलमध्ये असणाऱ्या गुगल पे द्वारे ५००० रुपये असे एकूण ५७०० रुपये घेऊन तेथून पळून गेले , असे पोलिसांना दिलेल्या जवाबात शेशादी याने म्हटले आहे.

यासंदर्भात पवई पोलीस ठाण्यास माहिती मिळताच भादवि कलम ३९२, ३४ सह गुन्हा नोंद करत गुन्हे प्रकटीकरण अधिकारी (detection officer) सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) (Assistant Police Inspector) विनोद पाटील आणि पथकाने घटनास्थळी धाव घेत आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले.

“पैसे घेण्यात आलेल्या गुगल पे खाते क्रमांक बाबत तांत्रिक माहिती प्राप्त करून नमुद खाते वापरणारा आयुष राजभर यास नीटी परिसरातून ताब्यात घेवून पोलीस ठाणेस चौकशी केली असता, त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा मित्र सतीश यादव याच्यासह केल्याची माहिती दिली,” असे यासंदर्भात बोलताना गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि पाटील यांनी सांगितले.

अटक दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अटक दोन्ही आरोपींचा अशाच आणखी काही गुन्ह्यात समावेश असल्याचे समोर येत आहे. आयआयटीमध्ये शिकणाऱ्या अजून दोन विद्यार्थ्यांकडून १८ हजार रुपये अशाच पद्दतीने या दोघांनी जबरी चोरी केल्याची माहिती नुकतीच समोर आल्याचे पवई पोलिसांनी सांगितले. अजूनही काही गुन्ह्यात या दोन्ही आरोपींचा समावेश आहे का? याबाबत पवई पोलीस अधिक तपास करत आहेत.

, , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!