पाठीमागील काही दिवसात पवई परिसरात आणि विशेषतः चैतन्यनगर आणि आसपासच्या भागात चोरट्यांनी धुडगूस घातला आहे. जवळपास दर दोन तीन दिवसांनी चोरीच्या घटना घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रविवारी पवई परिसरात घडलेल्या एका घटनेत तर चोरट्यांनी घरात काहीच मौल्यवान वस्तू न मिळाल्याने चक्क घरातील एक टीव्ही आणि बूट पळवल्याचे समोर येत आहे. याबाबत पवई पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या संदर्भात पवई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिरुद्ध चाबुकस्वार हे भाडे तत्वावर चैतन्यनगर येथे राहतात. १० ऑक्टोबर रोजी ते अहमदनगर येथे आपल्या मूळ गावी गेले होते. सोमवारी घराचे मालक यांनी अनिरुद्ध यांना फोन करून घरभाडे मागितले असता त्यांनी मी गावीच असल्याचे मालकांना सांगितले. “त्यावेळी ते मला म्हणाले ११ तारखेला घराचा अर्धा दरवाजा उघडा दिसला होता. हे ऐकताच मी त्यांना पहायला सांगितले असता त्यांनी घराचा कडी कोयंडा तुटला असून, घरात चोरी झाले असल्याचे मला सांगितले,” असे याबाबत बोलताना अनिरुद्ध यांनी सांगितले.
त्वरित मुंबईत येऊन घराची पाहणी केली असता घरातून टीव्ही, केबलबिल भरण्यासाठी ठेवलेले १२०० रुपये याच्यासह माझा एक नाईके कंपनीचा शूज चोरीला गेला असल्याचे लक्षात आले, असे पोलिसांना दिलेल्या जवाबात अनिरुद्ध यांनी म्हटले आहे.
“आम्ही परिसरात सतत गस्त घालत आहोत, मात्र पोलीस पुढे गेल्याचा आणि अंधाराचा फायदा घेवून हे चोरटे डाव साधत आहेत. यातील काही संशयितांची ओळख पटली आहे. तर काही संशयिताना आम्ही चौकशीसाठी ताब्यात सुद्धा घेतले आहे, असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.
सध्या आयपीएलचे दिवस असून, त्याचे लाईव्ह प्रक्षेपण टीव्हीवर सुरु आहे. या चोरट्यांना आयपीएल बघायला टीव्ही नसल्याने त्यांनी टीव्ही पळवली अशी विनोदी चर्चा सध्या या भागात सुरु आहे.
“चोरीच्या सर्व घटनांची पध्दती पाहता चोरटे हे रात्री २ ते ५ या वेळेत आपला डाव साधत आहेत. पहाटे लोक शौचासाठी बाहेर पडले की चोरटे उघडा दरवाजा पाहून दरवाजाच्या जवळच्या विजेच्या बोर्डात किंवा खिडकीजवळ चार्जिंगसाठी लावलेले फोन चटकन घेवून पलायन करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी थोडी सावधानता बाळगली तर पोलिसांना या चोरांच्या मुसक्या आवळायला सहकार्य होऊ शकते, असेही याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.
No comments yet.