कर्करोग काळजी आणि उपचार क्षेत्रातील एक विश्वासार्ह नाव असणाऱ्या वसंता मेमोरियल ट्रस्टतर्फे शनिवारी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ४ फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिनानिमित्त शालेय मुलांसाठी ही चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. पवई आणि आसपासच्या शाळांमधील जवळपास ९० मुलांनी या स्पर्धेत भाग घेतला.
भाग्यश्री पाटील आणि प्रशांत पाटील यांनी चित्रांचे परीक्षण करून प्रत्येक श्रेणीत ३ उत्कृष्ट चित्रण बक्षिसे आणि दोन प्रोत्साहनात्मक बक्षिसे देण्यात आली. विजेत्यांना गुणवत्ता प्रमाणपत्रही देण्यात आले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना बिस्किटे, स्नॅक्ससह आर्ट किट देखील देण्यात आली. यावेळी मुलांसमवेत आलेल्या मातांमध्ये महिलांमधील कर्करोगाबाबत जनजागृती करण्यात आली.
१९९३ पासून वसंता मेमोरियल ट्रस्ट चेन्नई आणि मुंबई येथे कार्यरत आहे. ‘कॅन्सर होण्यापासून रोखणे आणि वेळेत निदान करणे’ या मिशनसह गेली २८ वर्षे कर्करोगाविषयी जनजागृती करत आहे.
कर्करोगाबद्दल जनजागृतीसाठी ट्रस्ट शहरातील विविध शाळांमध्ये ‘कर्करोगमुक्त उद्या’ ही मोहीम देखील राबवत आहे.
चित्रकला स्पर्धेत मुलांची कल्पनाशक्ती दिसून आली. दारू आणि तंबाखूचे हानिकारक परिणाम, चांगल्या आहाराच्या सवयी, जंक फूड टाळावे, वैयक्तिक आणि पर्यावरणीय स्वच्छतेचे महत्व असे बरेच काही दर्शविणारी चित्रे यावेळी मुलांनी रेखाटली.
यावर्षी दोन वर्षांच्या अंतरानंतर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अनेक मुले एकत्र बसून चित्रे काढताना पाहणे हे एक अद्भुत दृश्य होते. आगामी शैक्षणिक वर्षांमध्ये आजूबाजूच्या अनेक शाळांचा समावेश करण्याचे ट्रस्टचे उद्दिष्ट असल्याचे संस्थेच्या सह संस्थापिका जयालक्ष्मी कृष्णन यांनी सांगितले.
No comments yet.