पवईच्या फिल्टरपाडा परिसरात राहणाऱ्या प्रथमेश सोमा हिरवे या २५ वर्षीय तरुणाची भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. पालिकेच्या शाळेत शिक्षक असलेले वडील सोमा आणि आई इंदू यांच्या समवेत दहा बाय दहाच्या खोलीत राहणाऱ्या प्रथमेशने आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर गरुड झेप घेत मुंबईतून पहिल्या तरुणाच्या निवडीचा मान पवईला मिळवून दिला आहे.
फिल्टरपाडा येथील मिलिंद विद्यालयमध्ये मराठी माध्यमातून दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या प्रथमेशला सुरुवाती पासूनच इंजिनिअरिंगमध्ये आवड होती. मात्र, कलचाचणीमध्ये तो इंजिनियरिंग करू शकत नाही असे तज्ज्ञांनी सांगितल्यानंतर आता इंजिनीयर बनायचेच असा त्याने निर्णय घेतला.
विलेपार्ले येथील भागूबाई मफतलाल पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये त्याने इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगसाठी प्रवेश घेतला, मात्र मराठीतून शिक्षण घेतलेल्या प्रथमेशला इंग्रजी मधून दिले जाणारे शिक्षण अवघड वाटू लागल्याने प्रश्नांपासून वाचण्यासाठी त्याचा बॅक बेंचर झाला होता.
जिद्दीला पेटलेल्या प्रथमेशने आपल्या इंग्रजीची समस्या शिक्षकांपुढे मांडल्यावर डिक्शनरीचा वापर आणि इंग्रजी पुस्तके वाचण्याचा सल्ला त्याच्या आयुष्यात खूप मोलाचा ठरला.
एल एन्ड टी आणि टाटा पॉवरसारख्या कंपनींमध्ये इंटर्नशिप करत असताना काही मार्गदर्शकांनी त्याला डिग्री शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला. ज्यानंतर प्रथमेशने नवी मुंबईमधील इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमधून इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगची पदवी संपादन केली.
२०१६ मध्ये त्याने यूपीएससीची परीक्षाही दिली होती; परंतु त्याचा ओढा इस्रोकडे असल्याने मे महिण्यात त्याने इस्रोला अर्ज केला होता आणि अखेर आता त्याची स्वप्नपूर्ती होत असून, इस्रोमध्ये त्याची शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. थोड्याच दिवसात तो चंदीगढ येथे इस्रोमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून रुजू होणार आहे.
सध्या ठिकठिकाणी त्याचा सत्कार आणि कौतुक होत आहे. त्याच्या या कामगिरीबाबत आम्हाला मोठा अभिमान आहे. त्याच्या जिद्दीला आणि अहोरात्र केलेल्या मेहनतीला यश मिळाले आहे.” असे प्रथमेशच्या यशाबाबत बोलताना त्याचे वडील सोमा यांनी सांगितले.
No comments yet.