एका नामांकित विमान कंपनीच्या खोट्या वेबसाईटला भेट दिल्याने ७५ वर्षीय पवईकराला आपले ३.५ लाख गमवावे लागले आहेत. आपल्या व पत्नीच्या वाराणसी येथील प्रवासाच्या बदलासाठी (पुढे ढकलण्यासाठी) ज्येष्ठ नागरिकाने या वेबसाईटला भेट दिली होती. आपल्या बचत खात्यातून एवढी मोठी रक्कम आपला फोन हॅक करून पळवल्याबाबत तक्रार या ज्येष्ठ नागरिकाने पवई पोलीस ठाण्यात केली आहे.
कोरोना महामारीमुळे तक्रारदार यांनी आपले प्रवासाचे नियोजन पुढे ढकलत मार्च महिन्यात नियोजन केले होते. त्याप्रमाणे त्यांनी विमान प्रवासाचे नियोजन करत तिकिटे बुक केली होती. “मात्र कोरोनाची भीती अजून कायम असल्याने आपले नियोजन पुढे ढकलण्यासाठी विमान कंपनीचा नंबर ऑनलाईन शोधत असताना त्यांनी या फेक वेबसाईटला भेट दिली. तिथे दिलेल्या टोलफ्री नंबरवर त्यांनी संपर्क साधला असता समोरील टेलीकॉलरने तुम्हाला तुमच्या प्रवासाच्या तिकीटच्या बदलाबद्दल आमच्या संबंधित एक्झिक्युटिवचा फोन येईल असे सांगितले. काही वेळातच त्यांना फोन करून समोरील व्यक्तीने एनी डेस्क नामक एप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगत आलेला ४ डीजीट कोड मागितला,” असे याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.
काही वेळातच ज्येष्ठ नागरिकाला ५० हजार रुपयाच्या व्यवहाराचा संदेश प्राप्त झाला. सोबतच अजून ८ व्यवहार मिळून एकूण ३ लाख ५० हजार रुपये त्यांच्या खात्यातून हस्तांतरण झाल्याचे त्यांच्या समोर आले. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच त्यांनी पवई पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.
“आम्ही तक्रारदार यांच्या खात्यातून कोणत्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे याबाबत माहिती मागवली आहे,” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.
पवई पोलिसांनी याबाबत फसवणूक आणि ओळख चोरी करणे (बनावट ओळख) बाबत गुन्हा नोंद केला असून, सदर विमान कंपनीला त्यांच्या कंपनीच्या नावे बनावट (फेक) वेबसाईट अस्तित्वात असल्याची काही माहिती होती का? याबाबत सुद्धा पोलीस माहिती मिळवत आहेत.
No comments yet.