पवईचे बहुजनवादी नेतृत्व आणि दिन-दुबळ्यांच्या न्यायहक्कांसाठी लढणारे प्रकाश (बाबा) बिऱ्हाडे यांनी आज, गुरुवार १० जून रोजी बहुजन वंचित आघाडी पक्षात प्रवेश केला. बहुजन वंचित आघाडीचे पार्लमेंटरी सदस्य मा. अशोकभाऊ सोनोने यांच्या हस्ते बिऱ्हाडे यांचा पक्ष प्रवेश पवईतील डॉ. आंबेडकर उद्यान परिसरात पार पडला. यावेळी नवी मुंबई निरीक्षक मा. आनंद जाधव, वसई विरार निरीक्षक मा. रामेश्वर दवंडे, उत्तर-मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष (महिला आघाडी) कृतिका जाधव, मुंबई प्रदेश कमेटीचे भारत हराळे, माजी सैन्य आणि पोलीस अधिकारी सुधाकर कांबळे, वॉर्ड अध्यक्ष १२१ मोहन आंबीरे, महिला वॉर्ड अध्यक्ष शारदा मोरे तसेच मोठ्या प्रमाणात भिम अनुयायी उपस्थित होते.
पवईतील डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान भागात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यासाठी जनतेच्या मागणीचा पाठपुरावा करत २००८ साली विधीमंडळाने मंजुरी देवूनही २०१६ पर्यंत पालिका पुतळा बसवण्यास टाळाटाळ करत होती. याची गंभीर दखल घेत बाबा बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वात पवई पुतळा समितीच्यावतीने १४ एप्रिल २०१६ला शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीचे औचित्य साधत हजारो भिम अनुयायांच्या उपस्थितीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा १५ फुट उंच पुतळा या उद्यानात बसवण्यात आला. या कार्यात त्यांना अनेक गुन्हे आणि कारवाईचा सामना सुद्धा करावा लागला होता. मात्र, ते न-डगमगता वंचित बहुजन समाजासाठी करत असलेल्या कार्यामुळे या समाजाचा मोठा पाठींबा त्यांना मिळाला होता. ज्यामुळे पवईचे बहुजनवादी नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
“मी नेहमीच वंचितांच्या न्याय-हक्कासाठी लढत आलो आहे. जनतेच्या आग्रहास्तव आणि कामासाठीच मी रिपाई पक्षात काम करत होतो. मात्र त्या पक्षाचे नेतृत्व आणि पदाधिकारी यांची वंचित, बहुजन, आंबेडकरी अनुयायांबाबत असलेली भूमिका पाहता त्यांच्यासोबत पुढे चालणे मला शक्य नव्हते. आंबेडकरी अनुयायांसाठी आणि वंचित बहुजन समाजासाठी कायम ठाम भूमिका घेणारे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू बहुजन नायक मा. बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्यात त्यांना साथ देण्याची माझी इच्छा होती. म्हणूनच आज मी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करत त्यांच्या इथून पुढील कार्यात साथ देण्यासाठी काम करणार आहे,” असे याबाबत बोलताना बाबा बिऱ्हाडे म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालत आलो आहे. येथून पुढील काळातही मी पवईतील वंचित बहुजन समाजाच्या न्यायहक्कांसाठी लढण्याचे काम करत राहणार आहे.”
“या परिसरात असणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्यासोबत बिऱ्हाडे यांच्या रुपात अजून एक मजबूत हात जोडला गेल्यामुळे येथील वंचित बहुजन समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याची ताकत वाढली आहे.” असे यावेळी बोलताना बहुजन वंचित आघाडीचे पार्लमेंटरी सदस्य मा. अशोकभाऊ सोनोने म्हणाले.
No comments yet.