@प्रमोद चव्हाण, रविराज शिंदे
आंदोलने, पोलीस कोठडी आणि सततच्या पवईकरांच्या पाठपुराव्याच्या खटाटोपीनंतर अखेर जुलै २०१५ मध्ये मंजुरी मिळून जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवरील मुख्य गणेश विसर्जन घाट, आयआयटी मार्केट जंक्शन आणि गांधीनगर येथे महानगर पालिकेकडून सार्वजनिक शौचालय उभारण्यात आली. मात्र काही दिवसातच पालिकेच्या देखरेखेखाली असणाऱ्या आयआयटी मार्केट जंक्शन आणि गांधीनगर येथील शौचालयांची दुरावस्था झाली असून, पाठीमागील दोन महिन्यापासून ही दोन्ही शौचालय बंद पडली आहेत.
जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडच्या निर्मितीपासून पवईमध्ये या रोडवर एकही सार्वजनिक स्वच्छतागृह बनवण्यात आले नव्हते. यामुळे पवईकर तसेच या मार्गावरून प्रवास करणाऱ्या अनेक नागरिकांचे हाल होत. खास करुन महिला वर्गाला नाहक समस्याला सामोरे जावे लागत असे. यासंदर्भात स्थानिक नागरिकांकडून वारंवार मनपा ‘एस’ विभागात तक्रारी करून सुद्धा जेव्हा प्रशासन काहीच ठोस पाऊले उचलत नसल्याचे पाहून स्थानिक नागरिकांनी मुतारी बनाव आंदोलन करून आपली ही मागणी प्रशासनापर्यंत पोहचवण्याचा पर्याय निवडला होता.
१६ मार्च २०१५ साली झालेल्या या आंदोलनात पवईतील तमाम नागरिकांनी सहभाग दाखवला होता. आयआयटी मेन गेट येथील फुटपाथावर पत्र्याचे शेड उभारत मुतारी बनाव आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनात पोलिसांनी हस्तक्षेप करत पवईतील रहिवाशी निलकंठ गुरव, विरेंद्र धिवार, अमोल चव्हाण, भाऊ पंडागळे, विनोद लिपचा, राजू गाडे, बाळु वाव्हुळकर, श्रीकांत पाटील, विजय कुरकुठे, भास्कर खरात, भारत सिंग, अनिल यादव, सचिन पाटील, अनिल काकडे, राहुल इंगळे, महेश देडे महिलांमध्ये चंदा खेडकर, उषा जगताप आदी आंदोलनकर्त्यांना अटक केली होती.
अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात आंदोलकांविरोधात कलम ३७ (३) सह १३५ मुंबई पोलीस कायदा अंतर्गत दोषारोपपत्र सादर करण्यात आले होते. यामुळे पवईकर जास्तीच क्रोधीत झाले होते. विनवणी झाली, मागणी झाली, आंदोलन झाली, शिक्षा झाली आणि आता कोर्ट कचेरी सुद्धा सुरु झाली, पण ज्याच्यासाठी हे सगळे झाले ती मुतारी नाही झाली. ती कधी बनणार? असा संतप्त सवाल स्थानिकांकडून उपस्थित झाला असतानाच त्याला पालिकेने मंजुरी देत पवईतील मुख्य गणेश विसर्जन घाट आणि आयआयटी मार्केट गेट जवळ दोन सार्वजनिक शौचालये बनवण्यात आली.
“आता समस्येचे निवारण झाले आहे असे वाटत असतानाच याची व्यवस्था पाहणाऱ्या संस्थेच्या हलगर्जीपणामुळे काहीच दिवसात शौचालयांची दुरावस्था झाली आहे. शौचालायात सांडपाणी साचणे, कडी तुटलेले दरवाजे, आतील भागात टाकलेल्या लाद्या तुटल्या आहेत, शौचालयात भयंकर दुर्गंधी येत असते अशी अवस्था या शौचालयाची झाली आहे”, असे याबाबत बोलताना स्थानिक नागरिकांनी सांगितले.
५ रुपये देऊन येथील सुविधा मिळवता येते, मात्र प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याने या शौचालयाची व्यवस्था पाहणाऱ्या संस्थेवर करवाईची मागणी स्थानिकांकडून जोर धरत आहे.
आयआयटी मार्केट जंक्शन येथील शौचालयात महिलांसाठी स्वतंत्र शौचालायचं नसल्याने महिला वर्गांची मोठी कुचंबणा होत होती. शौचालय आहे पण उपयोगाचे नाही अशी अवस्थाच या शौचालयाची होती. त्यात पाठीमागील ४ महिण्यांपासून हे शौचालयच बंद असल्याने स्थानिकांसह रहदारी करणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत असून, त्यांच्यात संताप आहे.
नागरिकांची होणारी गैरसोय पाहता आत्ता कार्यरत असणाऱ्या संस्थेला त्वरित हटवून, अन्य व्यवस्थापन संस्थेला याचे कार्य सोपवून लवकरात लवकर शौचालय सुरू करावे अशी मागणी युथ पॉवर संघटनेच्यावतीने करण्यात येत आहे.
No comments yet.