पवईमधील पंचश्रीष्टी कॉम्प्लेक्समधून जाणारा रोड हा चांदिवली – हिरानंदानी भागाला जोडणारा सर्वात महत्वाचा दुवा आहे. मात्र या रोडवर खाजगी वाहनांना प्रवेश निषिद्ध केला जाणार आहे. रहिवाशी संघटनेतर्फे तशा आशयाचे बोर्डस सुद्धा दोन्हीकडील प्रवेशाच्या ठिकाणी लावण्यात आले आहेत.
“हा पंचश्रीष्टी कॉम्प्लेक्सचा एक खाजगी रस्ता आहे म्हणून येथून बाहेरचे वाहन आणि जड वाहन यांना ये-जा करण्याची परवानगी नाही आहे.” असा संदेशच पंचश्रीष्टी कॉ. हौ. सोसायटी फेडरेशनच्यावतीने लावलेल्या फलकांवर देण्यात आला आहे.
हिरानंदानी आणि चांदिवली यांच्या मधोमध २ दशकांपूर्वी भागतानी बंधूंकडून शिवभगतानी, पंचश्रीष्टी कॉम्प्लेक्सचे निर्माण करण्यात आले आहे. ३ किलोमीटरवर साकीनाका, मुंबईतील प्रमुख परिसर असणारे पवईमध्ये आणि हिरानंदानी टाऊनचा शेजार अशा प्रसिद्धीमुळे घराच्या शोधात फिरणाऱ्या अनेक कुटुंबांनी येथे आपला निवारा निवडला. आजच्या तारखेला जवळपास ९ इमारतीत मिळून ८०० पेक्षा अधिक कुटुंबे या परिसरात वास्तव्यास आहेत. मात्र या सर्व कुटुंबाना अनेक मुलभूत सुविधाच विकासकाकडून मिळू शकल्या नाहीत. येथील रस्त्याची समस्या तर रहिवाशांची डोकेदुखी होऊन बसली आहे.
या कॉम्प्लेक्समधून जाणारा रस्ता हा हिरानंदानी – चांदिवली भागाला जोडत असल्यामुळे येथून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. पालिका प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि विकासक सगळ्यांनीच येथील रस्त्याचा विकास आणि डागडूजीपासून हात उचलल्यामुळे परिसरातील रस्त्यांची चाळण बनून तो रहदारी योग्य राहिलेला नाही.
“रस्त्याच्या दुरवस्थेबाबत स्थानिक प्रतिनिधी, पालिका प्रशासन आणि विकासक यांना आम्ही वारंवार तक्रारी करून सुद्धा ते प्रत्येकवेळा जबाबदारी एकमेकांकडे ढकलत दुसऱ्याकडे बोट दाखवण्याचे काम करत आहेत.” असे याबाबत बोलताना येथील नागरिकांनी सांगितले.
“विकासकाने तर पदोपदी आमची फसवणूकच केली आहे. पालिकेच्या दाव्यानुसार विकासकाने रस्ता बनवून तो मुंबई महानगर पालिकेला हस्तांतरित करणे आवश्यक असते, ज्यानंतर पालिका त्याची काळजी घेते. मात्र, आमच्या कॉम्प्लेक्समधील रस्ता पालिकेला हस्तांतरित करण्यात आलेलाच नाही, असे सांगून पालिका आमच्या प्रश्नाला प्रत्येकवेळी पूर्ण विराम देण्याचे काम करत आहे.” असेही रहिवाशी पुढे म्हणाले.
विकासकाने तर घरे विकताच येथून काढता पाय घेत येथील समस्यांकडे सरळ सरळ पाठच फिरवलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी जायचे तर जायचे कुठे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अखेर रहिवाशी संघटनानी पुढाकार घेत रहिवाशी फंडातून येथील रस्त्यांच्या दुरुस्तींचे, डागडूजीचे काम सुरु केले आहे. मात्र, या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्यामुळे रस्ता जास्त काळ टिकाव धरत नाही. पालिकेचा हा खाजगी रोड असल्याचा दावा, स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आणि वारंवार डागडूजीचा भुर्दंड रहिवाशांना पडत असल्यामुळे, कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या रहिवाशांची वाहने वगळता इतर वाहनांना प्रवेश नाकारण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या फलक लावून लोकांना सूचित करण्याचे काम सुरु असून, लवकरच याच्यावर अंमलबजावणी केली जाणार असल्याचेही फेडरेशनच्यावतीने सांगण्यात येत आहे.
No comments yet.