पवई तलाव भागात असलेल्या अंधाराचा फायदा घेत काही अनोळखी इसमांनी चाकूचा धाक दाखवून, पतपेढीच्या वसुली प्रतिनिधीला मारहाण करून ६० हजाराची लूट केल्याची घटना काल (शुक्रवारी) रात्री पवई परिसरात घडली. याबाबत पवई पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे.
अमरनाथ गौड (४९), विक्रोळी परिसरात असणाऱ्या शुभम पतपेढीत वसुली प्रतिनिधी म्हणून काम पाहतात. शुक्रवारी नेहमीप्रमाणे आपल्या पवई, एमआयडीसी व आसपासच्या परिसरात राहणाऱ्या ग्राहकांकडून पैसे जमा करून रात्री १०.१५ च्या दरम्यान सायकलने ते परतत होते.
“पवई तलाव गणेशघाट पार करून ते थोडे पुढे आले असतील, तेव्हा अंधाराचा फायदा घेत काही अज्ञात चोरट्यांनी लाकडी दांडक्यांनी त्यांना मारहाण करत त्यांच्याजवळ असणाऱ्या पैशाची पिशवी आणि पावती मशीन घेवून तेथून पोबारा केला. रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या काही प्रवाश्यांनी त्यांना पवई रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या गुडघ्याच्या खालील भागाला जबर मार लागला असून, ते सध्या नायर रुग्णालयात उपचार घेत आहेत.”असे आवर्तन पवईशी बोलताना गौंड यांचे नातेवाईक श्रवण यांनी सांगितले.
“आम्ही जबरी चोरीचा गुन्हा नोंद केला असून, चोरट्यांचा शोध सुरु केला आहे” असे पवई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पवई पोलिसांनी सदर गुन्ह्यात एका व्यक्तीस ताब्यात घेतले असून, त्याच्याकडे चौकशी सुरु आहे.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.