संघर्षनगर इमारत क्रमांक १० जवळ काल रात्री ११ वाजण्याच्या सुमारास जमीन आणि रस्ता खचून बराचसा भाग बाजूलाच सुरु असणाऱ्या इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी पडला. नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोत वळवला असल्यामुळे हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे.सुदैवाने जिवित हानी टळली आहे.
अग्निशमन दल आणि साकीनाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून परिसरातील वाहतूक आणि वर्दळ बंद करून सुरक्षेच्या उपाययोजना केल्या आहेत. घटनास्थळा शेजारच्या इमारतींना असणारा धोका पाहता आसपासच्या भागात असणाऱ्या इमारती रिकाम्या करण्यात आल्या असून, त्यातील रहिवाशांना तात्पुरते जवळच असणाऱ्या कम्युनिटी हॉलमध्ये हलवण्यात आले आहे.
मुंबईतील बोरीवली राष्ट्रीय उद्यानाच्या कांदिवली, बोरवली, मालाड अशा भागात झोपडपट्टीत राहणाऱ्या अनेक कुटुंबांचे झोपडपट्टी पुनर्वसन अंतर्गत संघर्षनगर येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. याच पुनर्वसन करण्यात आलेल्या इमारत क्रमांक १० समोर भूस्खलनाने काल रात्री रस्ता आणि जमीन धसल्याची घटना घडली आहे.
येथील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ११ वाजण्याच्या सुमारास काहीतरी फुटावे असा जोरदार आवाज झाला होता. काय घडले पाहण्यासाठी नागरिकांनी धाव घेतली असता भूस्खलन होत रस्ता, नाल्याचा काही भाग आणि शेजारी बांधकाम सुरु असणाऱ्या इमारतीच्या सुरक्षेसाठी लावलेले पत्रे हे सर्व बांधकाम सुरु असणाऱ्या भागात कोसळले. “शेजारी बांधकाम सुरु असणारा विकासकाने नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत वळवला असल्यामुळे हा अपघात घडला आहे” असे याबाबत बोलताना स्थानिक नागरिकांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले “आमच्या इमारतींना धोका असल्याबाबतच्या तक्रारी आम्ही वारंवार पालिकेकडे केल्या आहेत. मात्र पालिकेने याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. पाठीमागील वर्षी सुद्धा या भागात रस्ता खचला होता. त्यानंतर पालिकेने खबरदारी घेणे आवश्यक होते. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. पुढील धोका पाहता पावसाळ्यापुर्वीच हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करणे आवश्यक होते. मात्र त्यांच्या निष्काळजीपणामुळे यावर्षी पुन्हा रस्ता खचण्याची घटना घडली आहे.”
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळावर पोहचलेल्या अग्निशमन दल आणि साकीनाका पोलिसांनी आसपासच्या इमारती खाली करत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
“एखादी घटना घडल्यानंतरच लोकप्रतिनिधी समोर येत असतात, मात्र अशा प्रकारची घटना घडू नये म्हणून उपाययोजना करण्यासाठी किंवा परिस्थितीची माहिती घेण्यासाठी ते कधीच येत नाहीत.” असेही याबाबत बोलताना स्थानिक नागरिकांनी सांगितले.
रस्ता खचलेल्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साठून नदीचे स्वरूप प्राप्त झाले असल्याचे आवर्तन पवईने काल निदर्शनात आणले होते. संध्याकाळी ५ नंतर स्थानिक नागरिकांनी या मार्गावरील वाहतूक बंद करत ती पाठीमागील रस्त्यावरून वळवली होती, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
Nahar . Chandivili. All these area was mountain area. This will happen. More than half of mountains occupied by buildings. Some or the other day it will. See the state of Powai.