पवई पोलिसांच्या ताफ्यात आता अत्याधुनिक चार सेग्वे दाखल झाल्या आहेत. शुक्रवार, २२ जानेवारीला साकीनाका विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त नागरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबुराव सोनावणे यांच्या हस्ते या सेग्वेचे उदघाटन करत गस्तीवरील पोलिसांना हे सेग्वे देण्यात आले.
मुंबई पोलिसांतर्फे वेगवेगळ्या परिसरामध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गस्त घालण्यात येते. मोटारसायकल आणि जीपसह, पायी गस्त घालत पोलीस परिसरात कायदा-सुव्यवस्था सुरळीत राखण्यासोबतच आपला परिसर सुरक्षित ठेवण्यासाठी कार्यरत असतात. पोलिसांची परिसरातील गस्त वाढवण्यासाठी पोलिसांना आता अत्याधुनिक स्वसंतुलित विद्युत स्कूटर्स म्हणजे सेग्वे देण्यात आल्या आहेत. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर गस्तीसाठी याचा सर्वांत पहिला वापर केला गेला.
केवळ मुंबई किंवा महाराष्ट्रातच नव्हे तर जगभर मुंबई पोलिसांची कीर्ती पसरलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये मुंबई पोलिसांना अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज करून स्मार्ट बनवण्याकडे सरकारचा कल आहे. फेब्रुवारी २०२० पासून मुंबईतील मरीन ड्राइव्ह व नरिमन पॉइंट परिसरामध्ये अशाप्रकारच्या स्वसंतुलित विद्युत स्कूटर्सचा वापर मुंबई पोलिसांकडून केला जात आहे. टप्प्याटप्प्याने यात वाढ करण्यात आली असून, काही दिवसांपूर्वीच वरळी सी-फेस येथे मुंबई पोलिसांची गस्त वाढवण्यासाठी अशाच स्वसंतुलित विद्युत स्कूटरचे उदघाटन करण्यात आले. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व हिंदी चित्रपट अभिनेता अक्षय कुमार, मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग उपस्थित होते.
समुद्र किनारी गस्तीसाठी वापरण्यात येत असणाऱ्या स्वसंतुलित विद्युत स्कूटर म्हणजेच सेग्वे आता पवई पोलीस ठाण्याच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. “पवई तलाव भागात गैरप्रकार रोखण्यासाठी सतत गस्त घालण्यासोबतच हिरानंदानी, रहेजा विहार सारख्या कॉम्प्लेक्समध्ये सुद्धा गस्तीसाठी याचा उपयोग केला जाणार आहे,” असे याबाबत आवर्तन पवईशी बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबुराव सोनावणे यांनी सांगितले.
“सुरुवातीच्या काळात पेट्रोलिंगसाठी (गस्त) जाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना सेग्वे चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यानंतर हळूहळू सर्वांना याचे प्रशिक्षण दिले जाईल. सेग्वेवरून गस्त घालणाऱ्या पथकात महिला आणि पुरुष कर्मचारी अशी दोघांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.” असेही यावेळी पवई पोलिसांतर्फे सांगण्यात आले.
No comments yet.