जून महिना अर्ध्यावर पोहचला असून, पावसाच्या तुरळक सरींनी हजेरी लावत आपल्या आगमनांचे संकेत दिले आहेत. मात्र लॉकडाऊन आणि कोरोनाच्या महामारीत अडकून पडलेल्या पालिका प्रशासनाला यावर्षी नालेसफाईला वेळेच्या नियोजनासाठी मोठी कसरत करावी लागली. मात्र आता पालिकेच्या माध्यमातून ठिकठिकाणी नालेसफाईच्या कामांना वेग आला आहे. पवईतील हिरानंदानी भागात सुद्धा नालेसफाई सुरु असल्याची चित्रे लोकांना दिसू लागली आहेत.
मार्च महिन्यात मुंबईमध्ये प्रवेश झालेल्या कोरोना विषाणूंमुळे आलेल्या ‘कोविड-१९’च्या महामारीमुळे अचानक संपूर्ण महाराष्ट्रासह मुंबई लॉकडाऊन झाली आणि सगळेच एकाजागी स्थिर झाले. यात नियोजित पावसाळापूर्व अनेक कामे सुद्धा रखडून पडली. मुंबईच्या वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासोबत येणाऱ्या पावसाळ्यात पावसाच्या पाण्याला योग्य मार्ग मिळवून देण्यासाठी नाले सफाईचे मोठे आवाहन पालिकेसमोर होते आणि अजूनही कायम आहे.
पवईतील मुख्य आकर्षण आणि मोठी लोकवस्ती असणाऱ्या हिरानंदानी भागात सुद्धा नालेसफाईच्या कामांना वेग आला आहे. “लॉकडाऊनमुळे अनेक कामगार कामावर हजर होऊ शकत नव्हते. मात्र अनलॉक १ मुळे अनेक कामगार कामावर हजर झाले असून, आम्ही लगेचच परिसरातील नालेसाईच्या कामांना सुरुवात केली आहे,” असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.
“हिरानंदानीतील केसिंगटन सेझ, साउथ एव्हेन्यूकडून ऑर्चड एव्हेन्यूकडे उताराचा भाग आहे. यामुळे या भागात बनवण्यात आलेल्या पर्जन्यवाहिन्या, गटारे यांच्या सोबतच रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी ऑर्चड एव्हेन्यूवर जमा होते. त्यामुळे या भागात जमा होणाऱ्या पाण्याचा दबाव लक्षात घेता प्रत्येकवर्षी प्रमाणेच या वर्षीही या भागात विशेष लक्ष देण्यात आले आहे. पाणी साठू नये म्हणून किंवा साठल्यास लवकरात लवकर त्यांचा मार्ग मोकळा व्हावा म्हणून उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत,” असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.
हिरानंदानीसह पवईतील इतर भागातही नाले, गटारे सफाईला सुरुवात झाली असून, पवईकरांना कमीत कमी त्रास सहन करावा लागण्याचा पालिका प्रशासन प्रयत्न करत आहे.
मुंबईत ११३ टक्के नालेसफाई, महापालिकेचा दावा
मुंबई महानगरपालिकेने कोरोनाशी लढण्यासोबतच यावर्षी ११३ टक्के गाळ काढल्याचा दावा मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी केला आहे. पावसाळ्यापूर्वी गाळ काढण्याचे जेवढे लक्ष्य ठेवण्यात आले होते. त्यापेक्षाही जास्त गाळ काढल्याचा दावा पालिकेने केला आहे.
पालिकेची संपूर्ण यंत्रणा कोरोनाच्या लढाईत गुंतलेली असल्यामुळे यंदा नालेसफाई नीट झालेली नसून, पावसाळ्यात मुंबईत पाणी तुंबणार अशी टीका विरोधकांनी केली होती. लॉकडाऊन आणि कामगारांअभावी यावर्षी नालेसफाईला उशिरा सुरुवात झाली होती. कोरोनामुळे आलेल्या परिस्थितीला सामोरे जात त्याच्यावर मात करत पावसाळापूर्व कामे पूर्ण केल्याचा दावा पालिकेने केला आहे.
आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.
No comments yet.