पवई, आयआयटी मेनगेट येथील गोखलेनगर परिसरात रविवारी लागलेल्या आगीत येथील फुटपाथवर असणारी तीन दुकाने जळून खाक झाल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. शोर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
याबाबत पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आयआयटी, गोखलेनगर परिसरात असणाऱ्या फुटपाथवर ज्यूस विक्री, चहाची टपरी, पानबिडी शॉप सारखी अनेक किरकोळ दुकाने थाटलेली आहेत. शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास येथील एका दुकानाला आग लागली आणि बघता बघता एकमेकांना लागून असणाऱ्या तीन दुकानांना या आगीने आपल्या कवेत घेतले.
आगीची माहिती मिळताच पवई पोलिस, अग्निशमक दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले व आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत आगीत तिनीही दुकाने जळून खाक झाली होती. रात्रीची वेळ असल्याने, दुकानात कोणी नसल्याने जीवितहानी टळली.
आग शॉटसर्किटने लागली असल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमक दलाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. मात्र स्थानिकांच्या मते हा कोण्या माथेफिरूचा डाव आहे, कारण आगीपासून काहीच अंतरावर एक शेकोटी पेटवली असल्याचे समोर आले आहे.
याबाबत पवई पोलीस अधिक तपास करत आहेत.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.