पवईत तरुणाचा संशयास्पद मृत्यू

पवईत पीजीमध्ये राहणारा एक २२ वर्षीय तरुण राहत्या खोलीत मृतावस्थेत आढळून आला आहे. गुरुवारी (३ ऑक्टोबर) रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याबाबत पवई पोलिसांनी अपमृत्युची नोंद करत अधिक तपास सुरु केला आहे.

अहमदनगर येथील असणारा श्रेयस कलापुरे हा पाठीमागील काही वर्षापासून, पवई येथील चैतन्यनगर भागात असणाऱ्या सुजा निकेतन इमारतीत पेइंग गेस्ट म्हणून आपल्या मित्रांसोबत राहत होता. तो एका खासगी बँकेत नोकरी करत होता.

“गुरुवारी संध्याकाळी त्याचे सहकारी परत आल्यावर त्यांना खोली आतून बंद असल्याचे आढळले. सतत दरवाजा ठोठावून देखील तो प्रतिसाद देत नसल्याने त्यांनी बाहेरून आत पाणी देखील टाकले, पण काहीच उपयोग झाला नाही,” असे पवई पोलिसांनी सांगितले.

दरवाजा उघडत नसल्याने काहीतरी गडबड असल्याचा अंदाज आल्याने मित्रांनी काही स्थानिकांना याबाबत माहिती देत त्यांच्या मदतीने दरवाजा तोडला. तरुण घरात बेशुद्ध अवस्थेत पडला होता.

पवई पोलिसांना माहिती मिळताच तात्काळ तरुणाला राजावाडी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासून दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले.

“तरुणाचे तोंड कपड्याने, मास्कने (मंकी कॅप) झाकलेले होते. चेहऱ्यावर प्लास्टिक पिशवी घातलेली होती. घरात कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही. मृतदेहाचे शवविच्छेदन राजावाडी रुग्णालयात करण्यात आले असून, त्याचा अहवाल येताच सर्व प्रकार स्पष्ट होईल,” असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

अजून एका अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही त्याच्या सोबत राहणाऱ्या इतर लोकांचे आणि सहकाऱ्यांचे जवाब नोंदवले आहेत. तो आर्थिक अडचणीत होता अशी माहिती समोर येत आहे.”

यासंदर्भात आवर्तन पवईशी बोलताना एका प्रत्यक्षदर्शिने सांगितले कि, ज्यावेळी ही घटना उघडकीस आली तेव्हाच एक डिलिव्हरी बॉय जेवणाचे पार्सल घेवून तिथे आला. ते पार्सल मृत तरुणानेच ऑनलाईन मागवले होते.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!