मुंबईत पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. यामुळे रस्त्यावरील नागरिकांची वर्दळ कमी झाली असून, याचा फायदा घेत चोरट्यांनी डाव साधला आहे. पवई परिसरात देखील अशा काही घटना समोर आल्या असून, पवईतील म्हाडा इमारतीत चोरट्यांनी विविध दोन माळ्यांवरील घरे फोडून १.८९ लाखाच्या सोन्याचे दागिने आणि रोख रक्कमेवर हात साफ केला आहे.
पवईतील विविध व्हाट्स ऍप गृप्समधून पवई चांदिवली भागात घडणाऱ्या चोरीच्या सत्यापित न केलेल्या संदेशनी धुमाकूळ घातला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याचवेळी पाठीमागील आठवड्यात चोरांनी पवईतील म्हाडा इमारतीत प्रवेश करत चोरी केली आहे.
इमारतीच्या सहाव्या मजल्यावर राहणारे भालेकर कुटुंबीय आणि ५ व्या मजल्यावर राहणारे कट्टीमनी कुटुंबीय कामानिमित्त घराबाहेर असताना चोरट्यांनी हा डाव साधला आहे.
यासंदर्भात भालेकर यांनी पोलिसांना दिलेल्या जवाबानुसार, त्यांच्या पत्नी या सकाळी कामासाठी घरातून निघून गेल्यानंतर ते स्वतः आपल्या मुलीला दुपारी शाळेसाठी सोडून आपल्या कामासाठी निघून गेले होते.
संध्याकाळी घरी परत आले तेव्हा घराच्या दरवाजाचा कोयंडा तोडून कोणीतरी घरात प्रवेश केल्याचे आढळून आले. घरात सर्व सामान अस्ताव्यस्त पडले होते आणि कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम कोणीतरी चोरी केले होते, असे पोलिसांना दिलेल्या जवाबात भालेकर यांनी म्हटले आहे.
त्यांनी आपल्या जवाबात पुढे म्हटले आहे, घरातील पाहणी करत असतानाच इमारतीच्या ५ व्या मजल्यावरून गोंधळाचा आवाज येत असल्याचे ऐकल्यावर तिथे जावून पाहिले असता या माळ्यावरील कट्टीमणी यांच्या घरात देखील कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी केल्याचे समजले.
यासंदर्भात पवई पोलीस भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३३१ (३) नुसार गुन्हा नोंद करून तपास करत आहेत.
“आम्ही आसपासच्या परिसरातले सीसीटीव्ही फुटेज तपासात असून, काही संशयित इसम येता-जाताना आढळून येत आहेत. त्यांच्याबाबत माहिती मिळवण्याचे काम सुरु आहे. सोबतच सराईत गुन्हेगारांची माहिती आणि चौकशीचे काम सुरु आहे. लवकरच आरोपी पोलिसांच्या ताब्यात असेल,” असे यासंदर्भात बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या तपासी अधिकाऱ्याने सांगितले.
No comments yet.