पालिका उद्यानातील शौचालय गेले चोरीला

2letहिरानंदानी येथील आंब्रोसिया इमारतीच्या बाजूला असणाऱ्या पालिका उद्यानात बांधण्यात आलेले शौचालय मलनिसारण वाहिनीला जोडले गेले नसल्याने ते वापरात नसून, त्याचे गोडाऊन झाले आहे. त्यामुळे या उद्यानातील शौचालय चोरीस गेले कि काय? अशी चर्चा स्थानिकांमध्ये आहे. याबाबत पुढाकार घेत शिवसेना शाखाप्रमुख निलेश साळुंखे यांनी पालिका प्रशासनाला पत्रव्यवहार करत लवकरात लवकर शौचालय मलनिसारण वाहिनीला जोडून जनतेसाठी खुले करण्याची मागणी केली आहे.

हिरानंदानी येथील आंब्रोसिया इमारतीच्या बाजूला असणाऱ्या भूखंड क्रमांक ७/२ वर पालिकेचे उद्यान उभारण्यात आलेले आहे. या उद्यानाची देखभालीची जबाबदारी लेक व्ह्यू डेव्हलोपरला काळजीवाहू तत्वावर देण्यात आलेली आहे. उद्यानाच्या निर्मितीच्या वेळीच येथे येणाऱ्या लोकांच्या सुविधेसाठी शौचालयाची निर्मिती करण्यात आलेली आहे. मात्र त्यानंतर लेक व्ह्यू डेव्हलोपरकडून केल्या जाणाऱ्या सततच्या पाठपुराव्यानंतरही पालिका ‘एस’ विभागातर्फे मलनिसारण वाहिनीला जोडण्यास लागणारी अनुमती मिळू शकली नाही. काही महिन्यांपूर्वीच हे उद्यान पालिकेला हस्तांतरित करण्यात आले असून, पालिकेच्या देखभालीत तरी सर्व अडथळे दूर करत या उद्यानातील शौचालयाची सुविधा सुरु करण्यात यावी अशी मागणी आता पवईकरांकडून होत आहे.

याबाबत बोलताना हिरानंदानी व्यवस्थापनेचे सुदिप्तो लहरी यांनी आवर्तन पवईशी बोलताना सांगितले, “आम्ही शौचालयातून बाहेर निघणारी वाहिनी मलनिसारण वाहिनीला जोडण्यासाठी सतत पाठपुरावा करत होतो, मात्र पालिकेतर्फे हे उद्यान आमच्या देखरेखीत असेपर्यंत अनुमती मिळू शकली नव्हती. आता हे उद्यान आम्ही पालिकेला हस्तांतरित केले आहे.”

या गैरसोईमुळे स्थानिक मात्र खूपच त्रस्त झाले असून, त्यांनी या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी सोशल नेटवर्कचा वापर करत आपल्या या समस्या मांडायला सुरवात केली आहे.

“आम्हाला स्थानिक नागरिकांच्या वारंवार तक्रारी मिळत होत्या. हजारोच्या संख्येने दररोज स्थानिक या उद्यानात जात असतात, मात्र उद्यानात शौचालय आणि पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे. विशेषतः स्त्रियांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागतो आहे. जे पाहता मी पालिकेला पत्रव्यवहार करत हे उद्यानातील बांधलेले शौचालय लवकरात लवकर मलनिसारण वाहिनीला जोडून नागरिकांसाठी खुले करावे अशी मागणी केली आहे”, असे आवर्तन पवईला शिवसेना शाखा ११५ चे शाखाप्रमुख निलेश साळुंखे यांनी सांगितले.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , , , , , , , , ,

Trackbacks/Pingbacks

  1. पालिका उद्यानातील शौचालयाचा प्रश्न अखेर मिटला | आवर्तन पवई - May 20, 2016

    […] पवईकरांकडून होत होती. आवर्तन पवईने “पालिका उद्यानातील शौचालय गेले चोरील… या मथळ्या खाली बातमी करून पालिका […]

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!