वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हिरानंदानीतील रस्ते होणार ‘वन वे’

RTE---ok-image---traffic-ouहिरानंदानी परिसरात वाढलेल्या वाहतूक कोंडीला फोडण्यासाठी हिरानंदानी विकासकाने पाऊले उचलत, आकार अभिनव कन्सल्टंट माध्यमातून वाहतूक समस्येचा अभ्यास केला आहे. समोर आलेल्या माहितीच्या आधारे वाहतूक विभागाला याचा अहवाल सोपवला आहे. या अहवालानुसार हिरानंदानीतील काही रस्ते एकमार्गी (वन वे) करण्याचे सुचवले आहे.

गेल्या काही महिन्यात हिरानंदानीत वाहतुकीच्या समस्येने स्थानिकांचे जनजीवन विस्कळीत केले आहे. दररोज वाढत जाणाऱ्या या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले असून, प्रशासनाला वारंवार तक्रारी करून काहीच उपाययोजना करण्यात येत नसल्याने, नागरिकांनी १४ सप्टेंबरपासून ऑनलाईन सह्यांची मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे.

हिरानंदानी विकासकाने सुद्धा यात पुढचे पाऊल टाकत वाढत्या वाहतूक कोंडीला फोडण्यासाठी उपाययोजना शोधण्याचे काम आकार अभिनव या संस्थेला सोपवले होते. एक महिन्याच्या संपूर्ण अभ्यासानंतर या संस्थेने याचा अहवाल बनवून त्यात परिसरातील काही ठराविक रस्ते एकेरी मार्गाने करण्याचा उपाय सुचवला आहे.

“संस्थेने वाहतूक समस्येचा पुरेपूर अभ्यास करून वाहतूक नियंत्रणाचे काही उपाय सुचवलेले आहेत. वाहतूक विभागाकडे याची सर्वस्वी अंमलबजावणी करण्याचे अधिकार असल्याने या अभ्यासाचा अहवाल आम्ही अपर पोलीस आयुक्त, वाहतूक विभाग मिलिंद भारंबे यांना पाठवला आहे. या संदर्भात लागणारे दिशादर्शक आणि रस्त्यातील बदल आम्ही त्यांना देणार आहोत.” असे याबाबत बोलताना हिरानंदानी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक निरंजन हिरानंदानी यांनी सांगितले.

एकदिशा (वन वे) होणारे मार्ग:

  • ईडन येथील आता एकमार्गी असणाऱ्या रोडमध्ये बदल केला जाणार असून, सायप्रेस येथून प्रवेश असेल तर ब्लू-बेल / एसएम शेट्टी शाळेकडे बाहेर पडता येईल.
  • हिरानंदानी स्कूल (नवीन) – रिचमंड ते जलवायू विहार / बस डेपो
  • स्वामी नारायण सर्कल ते गलेरिया मार्गे – सॉलीटर / बी जी हाउस ऑलंपिया ते हिरानंदानी रुग्णालय (टेक्नोलॉजी स्ट्रीट)
  • एमटीएनएल (आदि शंकराचार्य मार्ग) ते हिरानंदानी रुग्णालय सर्कल (९० फीट रोड)
  • नोरीटा/ एटलांटीस बिल्डींग – जेडे सर्कल – केसिंगटन मार्गे वेरोना फौटेन
  • ग्लेन गेट इमारत ते हिरानंदानी स्कूल (जुने)
  • बेस्ट डेपो ते नोरीटा/ एटलांटीस बिल्डींग पुढे उजवीकडे वळून मेन स्ट्रीट

हिरानंदानी ग्रुपचे व्यवस्थापक सुदीप्तो लेहरी याबाबत बोलताना म्हणाले, “अहवालानुसार येथील वाहतूक कोंडीत २७% भर ही बाहेरील वाहनांची असते. संकुलात त्यांचे कोणतेही काम नसते, ही वाहने फक्त एका परिसरातून दुसऱ्या परिसरात जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे अशा वाहनांना संकुलाच्या बाहेरील मार्गावरूनच बाहेर निघण्याची उपाययोजना या अहवालात दाखवण्यात आली आहे.”

नागरिक सुद्धा या निर्णयाने आनंदी असून, याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी स्वतः वाहतूक विभागाने उपस्थित राहणे आवश्यक आहे अशी त्यांची मागणी आहे, अन्यथा याचे पालन होणे अशक्य आहे. इडन, सायप्रेस येथे करण्यात आलेल्या एकेरी मार्गाचे तीनतेरा वाजले आहेत. अशीच अवस्था या नवीन रोडवर होवू नये म्हणजे झाले.

या संदर्भात आवर्तन पवईने वाहतूक विभागाचे अपर पोलीस आयुक्त यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी “अहवाल मिळाला आहे, लवकरच आमच्या विभागाकडून परिस्थितीची पाहणी करून आणि अहवालाचा अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल” असे सांगितले.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!