पोलिसांनी दोन मोटारसायकल चोरांना अटक केली असून, त्यांच्याकडून ४.५५ लाख रुपये किंमतीच्या नऊ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. यातील एक मोटारसायकल या चोरट्यांनी पवई परिसरातून चोरी केली आहे. जितेश सुरेश काळुखे (२५) आणि अरुण मतांग (२४) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत, दोघेही घाटकोपरचे रहिवासी असून, पार्ट-टाईम केटरिंगचे काम करतात.
त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३७९ (चोरीची शिक्षा) आणि ३४ (सामान्य हेतू) अंतर्गत शहरातील वेगवेगळ्या पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघे जॉयराईडसाठी मोटारसायकल चोरायचे. पोलिसांनी टिळक नगरमधील ५, नेहरूनगर आणि पवईमधील प्रत्येकी एक आणि इतर परिसरातील २ चोरीच्या मोटारसायकल त्यांच्याकडून हस्तगत केल्या आहेत.
अटकेला दुजोरा देताना पोलिसांनी सांगितले कि, “आरोपी मोटारसायकलच्या केबल्स कापून चावीशिवाय मोटारसायकल सुरु करत असत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने त्यांचा मागमूस काढत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.”
ते पुढे म्हणाले, “केटरिंगची नोकरी असल्याने ते नेहमी उशिरा घरी पोहोचत असत. त्यामुळे लवकर घरी पोहोचण्यासाठी त्यांनी मोटारसायकल चोरण्याचा निर्णय घेतला. घराजवळ आल्यानंतर दोघेही चोरीची दुचाकी सोडून देत असत.
या दोघांनी आणखी काही चोरी केल्या आहेत का? याचा तपास पोलीस करत आहेत.
No comments yet.