सिनेमा ग्राउंड, हरीचंद्र शर्मा उद्यान आणि हिरानंदानीतील दिनदयाल उपाध्याय मैदानावर भरणार भाजी मार्केट.
@रमेश कांबळे
कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर पवईतील आयआयटी मार्केटमध्ये होत असणारी गर्दी कमी करण्यासाठी १४ एप्रिल २०२०पर्यंत येथील मार्केट तात्पुरत्या स्वरूपात जवळच असणाऱ्या सिनेमा ग्राउंड आणि हरिचंद्र शर्मा मैदान येथे हलवण्यात आले आहे. तर हिरानंदानी आणि आसपासच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी हिरानंदानी गार्डन येथील दिनदयाल उपाध्याय मैदानात भाजी मार्केट भरवण्याचा निर्णय बृहनमुंबई महानगरपालिका ‘एस’ विभागाच्यावतीने घेण्यात आला आहे. सकाळी १० ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत हे मार्केट सुरुवातीच्या काळात या भागात असणार आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पवईतील विविध ठिकाणी फिरून पालिकेने कोरोनाच्या प्रसाराबाबत जनजागृती केली होती. मात्र छोट्याशा भागात असणाऱ्या आयआयटी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात दररोज नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडत असल्याने येथे सोशल डिस्टंन्सिंगची समस्या वाढत होती. एक कोरोनाग्रस्त व्यक्ती या मार्केटमध्ये जेवढ्या व्यक्तींच्या संपर्कात येईल तेवढ्या लोकांच्यात त्याचा प्रसार होईल, याचा विचार करता नागरिकांमध्ये सोशल डिस्टंन्सिंग निर्माण करण्यासाठी मोठ्या मैदानात हा बाजार हलवण्याचा निर्णय विचार सुरु होता.
या संदर्भात येथील स्थानिक नागरिक आणि भाजी विक्रेत्यांच्या प्रतिनिधीसोबत पालिकेने एक बैठकीचे आयोजन करून त्यांच्याकडून सूचना मागवल्या. या सूचनांच्या आधारावरच पालिकेने पवईतील मोकळ्या मैदानात हा बाजार भरवण्याचा निर्णय घेतला.
भाजी मार्केटमधील होणारी गर्दी पाहता कोरोनाचा प्रसार होण्याची भिती व्यक्त केली जात होती. गर्दी आटोक्यात आणण्यासाठी महानगरपालिका उपाययोजना करीत आहे. याचा विचार करताच सोमवारपासून उपाययोजना केलेल्या मैदानावर भाजी मार्केट स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पालिका अनुज्ञापन विभागातील अधिकारी वरिष्ठ निरीक्षक (अति. निर्मुलन) पंकज पवार यांनी सांगितले.
या मार्केटसोबतच पवई परिसरातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून महानगरपालिकेने योग्य ती खबरदारी घेतली असल्याचेही यावेळी पालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
बातम्यांच्या अपडेटसाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा
No comments yet.