पवईत १७ वर्षीय तरुणाचा खून; मारहाणीचा व्हिडीओ केला शूट; आरोपींना ५ तासात अटक

पवईतील मिलिंदनगर परिसरात राहणाऱ्या एका १७ वर्षीय तरूणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बुधवार, ३१ मार्चला पहाटे उघडकीस आली होती. अनिकेत रामा बनसोडे असे या तरुणाचे नाव असून, त्याला मारहाण करत त्याचा खून केल्याचे समोर येताच पवई पोलिसांनी पाच तासात ४ आरोपींना अटक केली आहे. अटक आरोपी जेविएलआरवर सुरु असणाऱ्या मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षारक्षक म्हणून काम करतात.

आरोपींनी मोबाईलमध्ये अनिकेतला मारहाण करतानाचा व्हिडीओ काढून गृपमध्ये टाकला होता. याच व्हिडीओच्या साहाय्याने पोलिसांना आरोपींची ओळख पटली आहे.

अनिकेत मंगळवारी दिवसभर घरी परतला नव्हता. दरम्यान बुधवारी पहाटे घराच्या परिसरात तो बेशुद्ध अवस्थेत मिळून आल्यावर त्याच्या आईने त्यास राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले.

तरुणाला मारहाण झाल्याची माहिती रुग्णालयाकडून प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने तीन पथके बनवून पवई पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सुरु केला होता.

“जेवीएलआरवर सुरु असणाऱ्या मेट्रोच्या कामाच्या ठिकाणावरून स्टीलचे पाईप चोरी केले म्हणून रात्रपाळीच्या सुरक्षारक्षकांनी लाकडी बांबू व लोखंडी रॉडने अनिकेतला मारहाण केल्याची खात्रीलायक माहिती गुप्त बातमीदारांकडून प्राप्त झाली होती,” पवई पोलिसांनी सांगितले.

“तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने आम्ही ४ आरोपींना विविध परिसरातून ताब्यात घेवून चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली,” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबुराव सोनावणे यांनी सांगितले.

उमेश रामचंद्र परब (३८), सुजतअली नौशादअली (२६), सचिन मांडवकर (३८) आणि संदीप उत्तम जाधव (३०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

मारहाण करतानाचा आरोपींनी बनवला व्हिडीओ

“चोरी करताना सापडल्यानंतर त्याला आरोपींनी जबर मारहाण केली होती. त्यानंतर त्याला आरोपींनी त्याच्या राहत्या परिसरात नेवून टाकले. मारहाण करतानाचा आरोपींनी एक व्हिडीओ सुद्धा शूट केला आहे,” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबुराव सोनावणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिलीप धामुणसे आणि पोलीस निरीक्षक विजय दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विनोद लाड, पोलीस उपनिरीक्षक अनिल पाठारे, पोलीस उपनिरीक्षक विशाल घोरपडे, पोलीस हवालदार मोहोळ, पोलिस नाईक जगताप, पोलीस नाईक गलांडे, पोलीस शिपाई कदम, पोलीस शिपाई देशमुख, पोलीस शिपाई कट्टे, पोलीस शिपाई सूर्यवंशी यांनी सदर कारवाई केली.

, , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!