आला रे आला गोविंदा आला; पवईत कोरोनामुक्त दहीहंडी

कोरोनाने देशभर थैमान घातल्याने पाठ्मागील दोन वर्ष दहीकाला उत्सवावर असणारे कोरोनाचे सावट पाहता उत्सव साजरा करण्यात आला नव्हता. मात्र आता कोरोनावर मात करत सर्व सुरळीत झाल्याने प्रशासनाने सर्व निर्बंध हटवले असून, यावर्षी मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात दहीकाला उत्सव देशभर साजरा करण्यात आला.

मुंबईसह देशभर प्रत्येकवर्षी मोठा आकर्षक दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. मुंबई, ठाणे येथील दहीहंडी पाहण्यासाठी देशाच्या विविध ठिकाणांवरून लोक येथे येत असतात. पवईतील अनेक भागात सामाजिक संस्था आणि समाजसेवक यांच्या माध्यमातून दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. पवई मध्ये सुद्धा या उत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला. पवईतील अनेक भागात गल्ली – बोळामध्ये छोट्या छोट्या दहीहंडी लावण्यात आल्या होत्या. परिसरातील अबाल-वृद्धांनी एकत्रित येत मोठ्या उत्साहात हंडी फोडण्याचा आनंद लुटला.

उच्चभ्रू वस्त्यांचा परिसर म्हणून ओळख असणाऱ्या पवई चांदिवली भागातील अनेक सोसायटीमध्ये देखील हंडी लावत रहिवाशांच्यावतीने गोपाळकालाचा उत्सव साजरा झाला. या सगळ्यात मोठे आकर्षण ठरले ते म्हणजे हिरानंदानी भागात शिवसेना उपविभागप्रमुख धर्मनाथ पंत यांच्यातर्फे आयोजित ‘हिरानंदानी दहीहंडी उत्सव’.

पोलिसांतर्फे प्रत्येक परिसरात एकाच मोठ्या हंडीला अनुमती देण्यात आल्याने पवईतील हिरानंदानी दहीहंडी उत्सव सर्वांचाच आकर्षणाचा विषय ठरला. दिवसभर मोठ्या संख्येने गोविंदा पथकांनी येथे हजेरी लावत थर रचून सलामी देत हंडी फोडण्याचा प्रयत्न केला. सांताक्रूझ येथील सागर दहीहंडी पथकाने ७ थर लावत ही हंडी फोडली.

सण, उत्सव हे चालीरिती परंपरा यांचे प्रतिक असते. भावी पिढीला यातून आपल्या संस्कृतीचे दर्शन घडते. म्हणूनच उत्सव सतत चालू रहावा आणि संस्कृती जपली जावी म्हणून पवईत प्रत्येकवर्षी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो” असे आयोजकांकडून यावेळी बोलताना सांगण्यात आले.

, , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!