पवई तलावाचा जलक्रीडा प्रस्ताव गुंडाळला

या तलावात निर्माण झालेल्या प्रदूषणापासून तलावाला वाचवण्यासाठी, पुनर्विकास करण्यासाठी आणि त्यास संरक्षित करण्यासाठी अनेक योजनांवर काम केले जात आहे. तलावात समृद्ध जैव विविधता आणि मगरीच्या दुर्मिळ प्रजाती आहेत.

संग्रहित छायाचित्र – प्रमोद चव्हाण

पवई तलाव भागाचे सुशोभिकरण केल्यामुळे पर्यटकांची संख्या वाढली आहे. पवई तलावात स्कुबा डायव्हिंग, वॉटर पोलो, बोट रेसिंग सारख्या जलक्रीडा सुरु करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. तसा ठरावही महापालिका सभागृहात मंजूर करण्यात आला होता. मात्र तलावात मगरींचा वावर असल्याने पालिका प्रशासनाने ही मागणी फेटाळून लावत पवई तलावातील जलक्रीडेच्या प्रस्तावाला पूर्णविराम दिला आहे.

मुळात पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून बनवण्यात आलेल्या पवई तलावातील पाण्याची पातळी खालावून ते पिण्यास अयोग्य असल्याने औद्योगिक वापरासाठी त्याचा उपयोग होत असतो. पाठीमागील काही वर्षात या भागात झालेल्या सौंदर्यकरणामुळे तलावाला अनेक मुंबईकर पर्यटक भेट देत असतात. जे पाहता या तलावात स्कूबा डायव्हिंग, वॉटर अ‍ॅरोबिक्स, वॉटर पोलो, बोट रेसिंग सारख्या जलक्रीडा सुविधा उपलब्ध कराव्यात. यामुळे पर्यटकांना विरंगुळ्याचे एक ठिकाण उपलब्ध होईलच सोबतच महानगरपालिकेच्या महसुलातही वाढ होईल, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सईदा खान यांनी पालिका सभागृहात केली होती.

ऑक्टोबर २०१८ मध्ये या ठरावाला सभागृहाने मंजुरी देत पालिका आयुक्तांच्या अभिप्रायासाठी पाठवला होता. स्थायी समितीच्या बैठकीत हा ठराव मांडण्यात आला, यावर अभिप्राय देताना पालिका प्रशासनाने याला नामंजुरी दर्शवली आहे.

पवई तलावात विविध जलक्रीडा सुविधा उपलब्ध करून दिल्यास तलावातील मगर, मासे, वनस्पती इत्यादी जल जीवसृष्टीला धोका संभवण्याची शक्यता आहे. तलावात जैवविविधता मोठ्या प्रमाणात आहे. सोबतच पवई तलावात मोठ्या संख्येने मगरी आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी सध्या पालिका काम करत आहे. मगरींच्या वावरामुळे जलक्रीडा करताना पर्यटकांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची भीती प्रशासनातर्फे वर्तवली आहे.

या तलावात निर्माण झालेल्या प्रदूषणापासून तलावाला वाचवण्यासाठी, पुनर्विकास करण्यासाठी आणि त्यास संरक्षित करण्यासाठी अनेक योजनांवर काम केले जात आहे. तलावात समृद्ध जैव विविधता आणि मगरीच्या दुर्मिळ प्रजाती आहेत. तलावाच्या किनाऱ्यालगत सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र मुंबई मेट्रो मार्ग-६ प्रकल्पामुळे हे काम स्थगित करण्यात आले आहे. लवकरच हे काम सुरू करण्यासाठी मेट्रो प्रशासनाशी समन्वय साधण्यात येत आहे, असेही पालिकेतर्फे सांगण्यात येत आहे.

, , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!