हिरानंदानी रुग्णालयाची अवयव प्रत्यारोपण मान्यता रद्द

किडनी रॅकेट उघडकीस आल्यानंतर राज्यस्तरीय अवयव प्रत्यारोपण समितीचा निर्णय

छायाचित्र श्रेय: बीझब्लॉग

छायाचित्र श्रेय: बीझब्लॉग

गुरुवारी पवईतील हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये सुरु असलेली शस्त्रक्रिया थांबवून, समाजसेवक आणि पवई पोलिसांनी किडनी रॅकेट उध्वस्त केल्यानंतर हिरानंदानी हॉस्पिटलला कोणत्याही प्रकारचे अवयव प्रत्यारोपण करण्यास तात्पुरत्या स्वरुपात बंदी करण्यात आली आहे. राज्यस्तरीय अवयव प्रत्यारोपण समितीतर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे.

गुरुवारी काही समाजसेवकांनी पोलिसांना हिरानंदानी रुग्णालयात किडनी रॅकेटच्या माध्यमातून एक शस्त्रक्रिया पार पडत असल्याची माहिती दिली होती. या माहितीच्या आधारे पवई पोलिसांनी छापा टाकून शस्त्रक्रिया रोखत माहिती मिळवली असता खोटी कागदपत्रे सादर करून एका महिलेस रुग्णाची पत्नी दाखवून तिची किडनी रुग्णास दिली जात होती. ज्यानंतर पोलिसांनी या रॅकेटमधील ४ लोकांना अटक केली आहे.

हिरानंदानी रुग्णालयात हा सगळा प्रकार घडला असल्याचे उघड झाल्यानंतर, निष्काळजीपणा बाळगलेल्या या हॉस्पिटल विरोधात तेथे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यास बंदी घालण्याचा निर्णय राज्यस्तरीय अवयव प्रत्यारोपण समितीच्या बैठकीत शुक्रवारी घेण्यात आला आहे. अवयव प्रत्यारोपणासाठी नोंदणी केलेल्या रुग्णांना अन्य रुग्णालयात हलवण्याच्या सूचनाही रुग्णालयाला देण्यात आलेल्या आहेत. अवयव प्रत्यारोपण कायद्याच्या कलम १९ चे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यानी सांगितले.

‘अवयव प्रत्यारोपण संदर्भात गैरप्रकार आढळल्यास रुग्णालयाला सुद्धा दोषी मानण्यात येणार आहे.’ रुग्णालयाच्या नैतिकता समितीवर सरकारी अधिकारी असला तरी निर्णय प्रक्रियेत काही काळच तो रुग्णाच्या संपर्कात असतो. त्यामुळे इतर गोष्टीला सर्वस्वी रुग्णालयच जबाबदार असते, असेही अधिकाऱ्यांतर्फे सांगण्यात आले आहे.

हिरानंदानी रुग्णालयातील किडनी रॅकेटची चौकशी करण्यासाठी तीन सदस्य समिती नेमण्यात आली आहे. डॉक्टर गौरी राठोड या समितीच्या प्रमुख असणार असून, लवकरच अजून दोन सदस्यांची नियुक्ती करून येत्या आठवडाभरात अहवाल सादर करतील.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!